जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत ‘नार्को’ आढावा बैठक; ६ समाजकंटक हद्दपार
रत्नागिरी: Ratnagiri Anti Drug Campaign अंतर्गत जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थविरोधी मोहिमेत केवळ २० दिवसांत २५ गुन्हे दाखल करून ३५ आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Ratnagiri Anti Drug Campaign अंतर्गत जप्ती आणि कारवाईचा आढावा
पोलीस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले की, या धडक कारवाईदरम्यान २२ ग्रॅम ब्राऊन शुगर (हिरॉईन) आणि २ हजार ७८५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. मागील वर्षभरात दाखल १२४ गुन्ह्यांसह आतापर्यंत एकूण ६० कारवायांमध्ये ८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गांजा व ब्राऊन शुगरच्या सेवनाचे प्रमाण नेपाळी कामगारांमध्ये अधिक आढळून येत असल्याने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारी बोटींची सखोल तपासणी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामसभा आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातही व्यसनमुक्तीसाठी जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक कारखान्यांची अचानक तपासणी अन् केंद्र-राज्य शासनाचे निर्देश
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले की, जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करी व सेवनाविरोधात सर्व यंत्रणांनी अधिक आक्रमक भूमिका घेत समन्वय राखून काम करावे. मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारी बोटींची नोंदणी पूर्ण करावी, तर MIDC, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्तपणे जिल्ह्यातील कारखान्यांची अचानक तपासणी करावी, असे आदेश त्यांनी दिले.
केंद्र आणि राज्य शासन या मोहिमेवर थेट लक्ष ठेवून असल्याने प्रत्यक्ष कारवाई आणि जनजागृतीवर भर द्यावा, असे सांगतानाच २०२९ पर्यंत देशाला नशामुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन मोहीम राबवण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले.
प्रांताधिकारी जीवन देसाई यांची धडक कारवाई; ६ आरोपी हद्दपार
महसूल व दंडाधिकारी स्तरावरही तस्करांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत असून, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी NDPS कायद्यांतर्गत एकाच दिवसात ६ समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
हद्दपार केलेले ६ आरोपी:
- सचिन राजाराम म्हापूसकर
- अरमान लियाकत धामस्कर
- नजब असीफ मिरजकर
- मस्तान मकदूम शेख
- फुरकान यासिन फणसोपकर
- अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर
२०२३ पासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत प्रांताधिकारी देसाई यांनी आजअखेर एकूण २१ जणांवर हद्दपारीची धडक कारवाई केली आहे.
बैठकीस प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती
या आढावा बैठकीला प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह क्षेत्रीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:17 30-09-2026















