नूतन इमारतीत अध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; थ्रीडी मॅपिंग शो दुरुस्तीसह विविध विषयांवर चर्चा
रत्नागिरी: Ratnagiri Municipal Council Meeting अंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (३० सप्टेंबर) सकाळी ११ वाजता नूतन इमारतीमधील समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या अध्यक्षा शिल्पा प्रशांत सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असून, यामध्ये शहरातील विविध विकासकामे, नगर पथविक्रेता योजना आणि स्वच्छता अभियानाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.
Ratnagiri Municipal Council Meeting मधील महत्त्वाचे विषय अन् अहवाल
सभेच्या सुरुवातीला २५ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले जाईल. तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ५८/२ अन्वये ज्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, ती कामे सभेसमोर जाहीर केली जाणार आहेत.
स्थानिक प्राधिकरण व नगर पथविक्रेता समितीशी सल्लामसलत करून पथविक्रेता योजनेबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर या सभेत अंतिम निर्णय घेतला जाईल. याशिवाय शहरातील कांबळेवाडी, नवानगर, पांढरा समुद्र परिसर तसेच मुरुगवाडा नाका येथील नागरी सुविधांच्या कामांच्या कार्यालयीन अहवालावर निर्णय होणे अपेक्षित आहे.
‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अन् थ्रीडी मॅपिंग शोबाबत निर्णय
‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक असणारा १०% स्वहिस्सा स्वच्छ भारत मिशन प्रोत्साहन अनुदानातून उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला जाईल. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शो व इतर अनुषंगिक कामे (खुले नाट्यगृह)’ पूर्ण झाल्यानंतर पुढील ५ वर्षांसाठी त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे (O&M) काम कंत्राटदार मे. स्टुडिओ वन यांच्याकडे सोपवण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
‘स्वच्छ प्रभाग स्पर्धा’ अन् विविध विकासकामांना मंजुरी
प्रभाग क्रमांक १४ मधील मांडवी समुद्रकिनारा व पार्किंग परिसरातील स्वच्छता व सफाई कामांचा अहवाल सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात येईल. यासोबतच, स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती राकेश चंद्रकांत नागवेकर यांच्या अर्जानुसार नगरपरिषदेच्या सर्व प्रभागांमध्ये ‘स्वच्छ प्रभाग स्पर्धा’ आयोजित करण्यावर निर्णय घेतला जाईल.
नगरपरिषदेच्या विविध विभागांमधील कामांना मुदतवाढ देणे, नवीन विकासकामांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देणे आणि मागवण्यात आलेल्या विविध निविदांवर निर्णय घेणे हे विषय पटलावर असतील. याशिवाय श्रीमती नयना श्रीपाद पाडाळकर यांचे नळ कनेक्शन चालू ठेवणे, प्रिंटर्सचे थकीत देयक अदा करणे व बजेट तरतुदीत वाढ करणे, आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:27 30-09-2026















