श्रीराम टॉकीजसमोरील घरामधून बाहेर पडलेल्या विवाहिता बेपत्ता; अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा नोंद
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या सुभाष रोडवरील श्रीराम टॉकीज समोरील भागातून एका ४३ वर्षीय विवाहित महिलेचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडल्यानंतर घटना
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सौ. आरती शिवाजी मोरस्कर (वय ४३, रा. श्रीराम टॉकीज समोर, सुभाष रोड, रत्नागिरी) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून अचानक बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या परत न आल्याने, त्यांना कोणत्यातरी अज्ञात कारणावरून अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.

भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल
या संदर्भात अपहृत महिलेचे पती श्री. शिवाजी मारुती मोरस्कर (वय ५०, रा. सुभाष रोड, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून २९ सप्टेंबर रोजी पहाटे १२:५६ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गु.र.नं. ३७६/२०२६ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.













