दुबई-तेल अवीव विमानात सहवैमानिकाच्या हल्ल्यात गंभीर जखमी; ३३ हजार फुटांवरून विमानावर नियंत्रण मिळवत तबुक विमानतळावर सुरक्षित लँडिंग
नवी दिल्ली : दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (Flydubai) विमानाच्या कॉकपिटमध्ये घडलेल्या थरारक घटनेत, स्वतः गंभीर जखमी होऊनही विमानावर नियंत्रण मिळवत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. "कॅप्टन स्मित मच्छार हे खरोखरच हिरो आहेत," अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अतुलनीय धाडसाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘एक्स’वर कौतुक
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत कॅप्टन मच्छार यांच्या शौर्याचे कौतुक केले. “मोठ्या धोक्याचा सामना करताना आणि गंभीर जखमी झाल्यानंतरही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी मोठे धैर्य दाखवले. त्यांच्या शौर्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली. भारताला कॅप्टन मच्छार यांचा अभिमान आहे. ते लवकर बरे होण्यासाठी, नव्या ताकदीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

३३ हजार फूट उंचीवर कॉकपिटमध्ये प्राणघातक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लायदुबईचे FZ1073 हे विमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळाकडे उड्डाण करत होते. विमान ३३ हजार फूट उंचीवर हवेत असताना कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये अचानक वाद झाला. संतापलेल्या सहवैमानिकाने (Co-pilot) कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असतानाही, कॅप्टन मच्छार यांनी कमालीचे धैर्य दाखवत विमानाचा ताबा स्वतःकडे घेतला.
सौदी अरेबियात विमानाचे सुरक्षित आणीबाणी लँडिंग
हल्ल्याच्या या थरारानंतर विमानातून तातडीने आपत्कालीन संदेश (Mayday Signal) पाठवण्यात आला. विमान ३३ हजार फूट उंचीवरून अत्यंत वेगाने खाली आले होते. मात्र, कॅप्टन मच्छार यांनी ऐनवेळी परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आणि विमान सुरक्षितपणे सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर उतरवले. या घटनेत दोन्ही वैमानिक जखमी झाले असून, लँडिंगनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे जगभरातून कौतुक केले जात आहे.













