१४ संघांच्या स्पर्धेत स्वरूपातील मोठा बदल; आज रात्री ८.३० वाजता स्टार स्पोर्ट्स व जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपण
नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२७ चे बहुप्रतीक्षित वेळापत्रक आज, १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे या घोषणेकडे लक्ष लागले असून, विशेषतः भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात असणार का आणि त्यांचा हाय-व्होल्टेज सामना कधी होणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
१४ संघांचा समावेश आणि स्पर्धेच्या स्वरूपात मोठा बदल
एकदिवसीय विश्वचषकाची ही १४ वी आवृत्ती असून ही स्पर्धा ४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२७ या कालावधीत खेळवली जाणार आहे. यावेळी आयसीसीने स्पर्धेच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या विश्वचषकात एकूण १४ संघ सहभागी होणार असून, त्यापैकी ११ संघांनी आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. उर्वरित एका जागेसाठी सर्वात कमी मानांकन असलेल्या तीन संघांमध्ये ‘सुपर सिरीज’ फेरी रंगेल, ज्यातील अव्वल संघ १२ वा संघ म्हणून मुख्य फेरीत प्रवेश करेल.

गट फेरीनंतर खेळवली जाणार ‘सुपर ७’ फेरी
मुख्य फेरीत १२ संघांची प्रत्येकी ६ संघांच्या दोन गटांत विभागणी केली जाईल. दोन्ही गटांतील अव्वल ३-३ संघ पुढील फेरीत पोहोचतील. यानंतर ‘सुपर ७’ फेरी खेळवली जाईल, ज्यामध्ये सातही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. ‘सुपर ७’ च्या गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत (सेमीफायनल) धडक मारतील. उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकावरील संघाचा सामना चौथ्या क्रमांकाच्या संघाशी, तर दुसऱ्या क्रमांकाच्या संघाचा सामना तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल.
भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहत्यांना नेहमीच प्रतीक्षा असते. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील अलीकडील राजकीय व क्रिकेट जगतातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर होणाऱ्या वेळापत्रकात हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत का, याचे स्पष्ट चित्र समोर येईल.
वेळापत्रक कुठे व कसे पाहता येणार?
विश्वचषक २०२७ च्या वेळापत्रकाची घोषणा १ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता थेट प्रक्षेपणाद्वारे केली जाईल. भारतात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर (Star Sports Network) केले जाईल, तर डिजिटल प्रेक्षकांसाठी ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओहॉटस्टार’ (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.













