NCMC Card System Issues: नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवरून रत्नागिरीत प्रवाशांची कोंडी; सर्व्हर डाऊनमुळे तिकीट वितरणात अडथळे

NCMC Card System Issues: नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवरून रत्नागिरीत प्रवाशांची कोंडी; सर्व्हर डाऊनमुळे तिकीट वितरणात अडथळे

एकाच मशीनवर रिचार्ज आणि तिकीट वितरणाचा भार; तांत्रिक अडचणींमुळे एसटी प्रवासी त्रस्त

रत्नागिरी :

NCMC Card System Issues मुळे रत्नागिरी जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या वतीने १ ऑक्टोबरपासून सवलतधारकांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC Card) बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, एकाच मशीनवर रिचार्ज करणे आणि तिकीट काढणे अशी दोन्ही कामे केली जात असल्यामुळे मशीनवर मोठा लोड येत आहे. तसेच नेटवर्क आणि सर्व्हर डाऊनच्या समस्यांमुळे कार्ड असूनही तिकीट निघत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्डमध्ये शुल्काचा (बॅलन्स) भरणा करण्यासाठी प्रवाशांची धावपळ होत असून, रिचार्ज नसल्यास वाहकाकडून पूर्ण तिकिटाची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे ‘एनसीएमसी कार्ड असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच परिस्थिती सध्या रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

मुदतवाढ देऊनही तांत्रिक समस्या कायम; ४ लाख सवलतधारकांची नोंदणी

Tata SUV

एसटी महामंडळामधील बोगस प्रवासी कमी व्हावे आणि केवळ अधिकृत सवलतधारकांनाच योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. यासाठी तब्बल तीन ते चार वेळा कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने १ ऑक्टोबरपासून या कार्डद्वारेच तिकीट काढण्याचे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख सवलतधारकांनी हे एनसीएमसी कार्ड काढले आहे. मात्र, एनसीसीएम कार्ड काढल्यानंतरही तांत्रिक अडचणी दूर न झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

नेटवर्क समस्या आणि एकाच मशीनवरील लोडिंग ठरतेय अडथळा

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी एसटी बस प्रवासादरम्यान सर्व्हर डाऊन होणे आणि नेटवर्कची समस्या उद्भवणे या प्रमुख अडचणी समोर येत आहेत. प्रवाशांनी कार्ड मशीनला लावूनही ‘नॉट अव्हेलेबल’ असा संदेश येत असल्याने तिकीट काढता येत नाही. त्यामुळे वाहकाला आणि प्रवाशांना नेटवर्क येण्याची वाट पाहावी लागते. त्यातच रिचार्ज आणि तिकीट काढण्याचे काम एकाच मशीनवरून होत असल्याने सिस्टीमवर अतिरिक्त भार पडत आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने वाहकांबरोबरच प्रवासीही त्रस्त झाले असून, रत्नागिरी विभागाचे अधिकारी आणि महामंडळाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

आकडेवारी आणि बसस्थानकांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

रत्नागिरी जिल्ह्यातील एनसीएमसी कार्ड नोंदणीची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

एकूण सवलतधारक: ७ लाख

आजअखेर नोंदणी: ४ लाख

प्रलंबित नोंदणी: ३ लाख

एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आणि ते रिचार्ज करण्यासाठी रत्नागिरीसह जिल्ह्यातील इतर बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत नागरिक रांगेत उभे राहत असल्याचे चित्र आहे. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा समावेश असून, त्यांना उन्हात ताटकळत राहावे लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी बसस्थानकांवर कार्ड काढण्यासाठी आणि रिचार्जसाठी खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

*प्रवाशाची प्रतिक्रिया:
*
"मी दररोज राजापूर-रत्नागिरी आणि रत्नागिरी-राजापूर असा प्रवास करते. नेटवर्क व सर्व्हर डाऊनमुळे तिकीट निघत नाही. त्यामुळे नेटवर्कची वाट पाहावी लागत आहे. कार्ड असून फायदा काय, असा सवाल उपस्थित होत आहे. रिचार्जसाठीही धावपळ करावी लागते. या समस्येकडे एसटी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे."

— प्राची पाटील, प्रवासी