मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २६ वी बैठक संपन्न
Wildlife Sanctuaries Maharashtra : महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या २६ व्या बैठकीत राज्यातील दोन नवीन राखीव वनक्षेत्रांना ‘वन्यजीव अभयारण्य’ (Wildlife Sanctuary) म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासोबतच राज्यातील विविध ७ जिल्ह्यांमधील १४ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांच्या (Conservation Reserves) प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, वन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी उपस्थित होते.
रानम्हशींसाठी प्रसिद्ध ‘कोलामार्का’ आता अधिकृत अभयारण्य
गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या रानम्हशींच्या अधिवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला’ आता अधिकृतपणे वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. रानम्हशींचे संवर्धन आणि संरक्षण अधिक प्रभावीपणे व्हावे, यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील तानसा वन्यजीव अभयारण्य मानव विरहित करण्यासाठी ‘नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्या’चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मौजे ओगदा, खोडदे, तिरमाळ, पाचघर, फणसाड आणि आमले या सहा गावांमधील ५८८.७६७ हेक्टर महसुली व खासगी क्षेत्र समाविष्ट करण्यास मंडळाने मान्यता दिली आहे.
१४ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता
पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील खालील १४ क्षेत्रांना संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे:
पुणे आणि रायगड : वेल्हे मुळशी, लोणावळा
पुणे : भोरगिरीगड
नाशिक : दिंडोरी, सुरगणा, ताहराबाद
नंदुरबार : चिंचपाडा
रायगड : अलिबाग, घेरा माणिकगड
ठाणे : गुमतारा
पालघर : जव्हार, आशेरीगड, धामणी
चंद्रपूर : एकारा
जायकवाडी आणि कोका अभयारण्यांबाबत मोठा निर्णय
मंडळाने भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्यातील १००.१३९ चौरस किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी पक्षी अभयारण्यातील २५५.७९ चौरस किलोमीटर क्षेत्र ‘धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास’ (Critical Wildlife Habitat) म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे निर्देश
*अभयारण्यांमधील धरणांची दुरुस्ती, पुनर्वसन आणि गाळ काढण्याच्या कामांसाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र मान्यता घेण्याऐवजी व्यवस्थापन आराखड्यात सुधारणा करून ३ महिन्यांत नवीन नियमावली (SOP) तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय, मानव-वन्यजीव संघर्षाला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करणे, व्याघ्र प्रकल्पांचे गाभा व बफर क्षेत्र शांतता क्षेत्र घोषित करणे आणि बफर क्षेत्रातील इच्छूक गावांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण तयार करण्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.













