कारवांचीवाडी फाट्याजवळील कारवाई; अन्य वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांचे पाऊल
Wrong-Side Driving Case : मुंबई-गोवा महामार्गावरील कारवांचीवाडी फाट्याजवळून हातखंबा ते रत्नागिरीदरम्यानच्या महामार्गावर विरुद्ध दिशेने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून अन्य वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धीरज धर्मराज सावंत (वय ३४, रा. बौद्धवाडी, खेडशी, जि. रत्नागिरी) व मोहम्मद अली सलाम काझी (वय ४६, रा. घाटीवळे, मुस्लिमवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) अशी या दोन्ही संशयित दुचाकीस्वारांची नावे आहेत. ही घटना रविवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी दीडच्या सुमारास कारवांचीवाडी फाटा ते रत्नागिरी महामार्गावर घडली.
विरुद्ध दिशेने वाहन चालवून निर्माण केला अपघाताचा धोका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित स्वार धीरज सावंत व मोहम्मद काझी हे दोघे आपापल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच ०८ बीआर ४८३५ आणि क्र. एमएच ०८ बीई ०१३६) घेऊन रत्नागिरी ते हातखंबा या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर विरूद्ध बाजूने दुचाकी अत्यंत निष्काळजीपणे चालवत होते. यामुळे रस्त्यावरील अन्य वाहनांना अडथळा निर्माण होऊन अपघाताचा मोठा धोका निर्माण झाल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले.
ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद
या प्रकरणाची गंभीर दखल घेत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. या तक्रारीनुसार धीरज सावंत व मोहम्मद काझी या दोघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात मोटर वाहन कायदा व संबंधित कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महामार्गावर नियम मोडून वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता अधिक कडक भूमिका घेतली आहे.














