बोडर्ये एस.टी. पिकअप शेडजवळील कारवाई; झारखंडमधील तरुणाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पाऊल
Illegal Liquor Consumption : देवरुख-मालेश्वर मार्गावरील बोडर्ये एस.टी. पिकअप शेडजवळ विनापरवाना दारू पिण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रदेव लिटू उराव (वय २७, सध्या रा. बोडर्ये पिकअप शेडजवळ, ता. संगमेश्वर; मूळ रा. लातेहार, झारखंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास घडली.
हातात दारूची बाटली घेऊन बसलेला आढळला तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुण उराव याच्याकडे मद्यप्राशन करण्याचा कोणताही वैध परवाना नसताना तो डांबरी रस्त्यालगतच्या बोडर्ये एस.टी. पिकअप शेडजवळ हातात दारूची बाटली घेऊन बसलेला निदर्शनास आला. विनापरवाना मद्यसेवनासाठी तयारी करत असल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणात कोणतीही मालमत्ता किंवा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही.
दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद
या प्रकरणाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमर कमलाकर घाडी (वय ३१, नेमणूक देवरुख पोलिस ठाणे) यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८.५८ वाजता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यसेवन व बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कठोर भूमिका घेतली जात आहे.














