Virtual Reality in ZP Schools : जिल्हा परिषद शाळांमध्येही ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’चे धडे; चिपळूण-संगमेश्वरमधील १० शाळा, ५० अंगणवाड्यांत आधुनिक तंत्रज्ञान

Virtual Reality in ZP Schools : जिल्हा परिषद शाळांमध्येही 'व्हर्च्युअल रिॲलिटी'चे धडे; चिपळूण-संगमेश्वरमधील १० शाळा, ५० अंगणवाड्यांत आधुनिक तंत्रज्ञान

कोयना भूकंप निधीतून १.६० कोटींचा उपक्रम; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शुभारंभ

Virtual Reality in ZP Schools : मुलांच्या स्वप्नांना योग्य दिशा मिळावी, त्यांना शिक्षणासाठी उत्तम साधने मिळावीत आणि प्रत्येक मुलाला स्वतःच्या क्षमतेनुसार पुढे जाण्याची संधी मिळावी, या उद्देशाने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये ‘श्रीडी शैक्षणिक मॉडेल्स’, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ (VR) चा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. कोयना भूकंप निधीतून १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, कोकणातील शालेय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

सह्याद्री शिक्षण संस्थेतून उपक्रमाचा शुभारंभ

सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत या उपक्रमाचा दणक्यात शुभारंभ करण्यात आला. चिपळूण तालुक्यातील ५ जिल्हा परिषद शाळा आणि २५ अंगणवाड्यांमध्ये, तसेच संगमेश्वर तालुक्यातील ५ शाळा आणि २५ अंगणवाड्यांमध्ये अशा एकूण १० शाळा आणि ५० अंगणवाड्यांमध्ये ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीत केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकण्याची, निरीक्षण करण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित होण्याची संधी मिळणे आवश्यक आहे, असे विचार आमदार शेखर निकम यांनी यावेळी व्यक्त केले.

Hotel star caters

व्हर्च्युअल रिॲलिटी आणि अत्याधुनिक उपकरणांची वैशिष्ट्ये

आभासी अनुभव : VR हेडसेट, संगणकीय यंत्रणा आणि शैक्षणिक सॉफ्टवेअरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना विज्ञान, भूगोल, अवकाश आणि मानवी शरीररचनेसारखे अवघड विषय आभासी अनुभवातून (Virtual Reality) समजून घेता येणार आहेत. यामुळे कठीण संकल्पना समजणे अधिक सोपे आणि रंजक होणार आहे.

अंगणवाड्यांसाठी आधुनिक साहित्य : अंगणवाड्यांमध्ये श्रीडी शैक्षणिक मॉडेल्स, डिजिटल चित्रे, ध्वनी, बालगीते आणि परस्परसंवादी अध्ययन साधनांचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे लहान मुलांना रंग, आकार, अक्षरे, अंक आणि प्राणी-पक्षी अधिक रंजक पद्धतीने शिकता येतील.

भविष्यातील विस्तार : या आधुनिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा अध्ययनातील सहभाग वाढेल आणि जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येला मोठी चालना मिळेल, असा विश्वास गटाशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांनी व्यक्त केला. तसेच टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात याचा विस्तार करण्याचा मानस आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केला आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, प्रदेश सरचिटणीस जयंत खताते, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, संजय कदम, शौकत माकनकर, शरद शिंगवण, अशोक कदम, रमेश राणे, दिशा दामोधर, दशरथ दामोधर, जागृती शिंदे, ऋतुजा इंगवले, देवराज गरगटे, विस्तार अधिकारी राजअहमद देसाई यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, अंगणवाड्यांच्या सेविका आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.