फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाची मोहीम
*रत्नागिरी: *Ratnagiri Hawkers Zone च्या अंमलबजावणीसाठी शहरातील फळ विक्रेत्यांसह इतर सर्व फेरीवाल्यांना ठरवून दिलेल्या अधिकृत हॉकर झोनमध्ये हलवण्याची मोहीम सोमवारपासून हाती घेण्यात येत आहे. रत्नागिरी शहरातील वाढत्या रहदारीला आळा घालण्यासाठी आणि फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी शहरातील आठवडा बाजार परिसरासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी विशेष झोन निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी १ नोव्हेंबरपासून ही कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती.
मात्र, १ नोव्हेंबर रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे प्रशासकीय कार्यवाही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. परिणामी, आज सोमवारपासून शहरातील सर्व फेरीवाल्यांना त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या हॉकर झोनमध्ये स्थलांतरित करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि शिस्त कायम राखण्यासाठी नगरपरिषदेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्व संबंधित फेरीवाल्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी केले आहे. या मोहिमेमुळे शहरातील मुख्य मार्गांवरील आणि बाजारपेठेतील अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन होऊन नागरिकांना सुरळीत व विनासायास चालण्यासाठी रस्ते मोकळे होण्यास मदत मिळणार आहे.














