दापोलीत चार महिन्यांत तीनवेळा सीएनजी दरवाढ

दापोलीत चार महिन्यांत तीनवेळा सीएनजी दरवाढ

सीएनजीचा दर ९६ रुपयांवर; वाहनधारकांच्या खिशाला बसतोय फटका, तीव्र नाराजी

दापोली – दापोली तालुक्यात सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल तीन वेळा सीएनजी दरवाढ करण्यात आली असून आता सीएनजीचा दर प्रतिकिलो ९६ रुपयांवर पोहोचला आहे. सातत्याने होत असलेल्या या दरवाढीमुळे सीएनजी वाहनधारकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडू लागले आहे.

किफायतशीर पर्यायाचा फायदा कमी

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत किफायतशीर पर्याय म्हणून अनेकांनी सीएनजी वाहनांना पसंती दिली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरूच असल्याने या पर्यायाचा आर्थिक फायदा कमी होत चालल्याची भावना वाहनचालकांची झाली आहे.

Shoping fiesta

रिक्षाचालक आणि व्यावसायिक अडचणीत

विशेषतः रिक्षाचालक, व्यावसायिक वाहनधारक आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. इंधन खर्च वाढत असताना प्रवाशांकडून भाडेवाढ करणेही सहज शक्य नसल्याने रिक्षाचालक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. चार महिन्यांत तीन वेळा दरवाढ होऊनही आता दर ९६ रुपयांवर पोहोचल्याने सीएनजी नेमका स्वस्त कधी होणार, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या या दरवाढीवर तात्काळ नियंत्रण आणण्याची मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.