Devrukh Sangameshwar Crime News: वृद्धेला अमानुष मारहाण; महिलेविरोधात गुन्हा दाखल

Devrukh Sangameshwar Crime News: वृद्धेला अमानुष मारहाण; महिलेविरोधात गुन्हा दाखल

वयोवृद्ध महिलेचा सांभाळ करावा लागत असल्याच्या रागातून ९१ वर्षांच्या वृद्धेला लाकडी बांबूने बेदम मारहाण; संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथील संतापजनक घटना

*देवरुख *- वयोवृद्ध महिलेचा सांभाळ करावा लागतो आणि त्यामुळे स्वतःला कुठेही फिरायला जाता येत नाही, या क्षुल्लक रागातून ९१ वर्षांच्या वृद्ध महिलेला लाकडी बांबूने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथे घडली आहे. या अमानुष मारहाणीत वृद्ध महिलेच्या हात, पाय व गुडघ्याला गंभीर दुखापती झाल्या असून, याप्रकरणी नाशिरा अस्लम मोडक (रा. नायरी, ता. संगमेश्वर) या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सीवूड्स, नेरूळ येथे वास्तव्यास असलेल्या जैबुन्निसा निजामउद्दीन लांबे (वय ६०) यांची आई जलेखा इसाक मोडक (वय ९१) या नायरी येथे राहतात. वय अत्यंत जास्त असल्याने जलेखा मोडक यांना दैनंदिन देखभालीसाठी दुसऱ्याच्या आधाराची गरज लागते. मात्र, या वृद्धेचा सांभाळ करावा लागत असल्यामुळे आपल्याला घराबाहेर कुठेही जाता येत नाही, या कारणावरून संशयित आरोपी नाशिरा मोडक हिने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी चार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात वृद्धेशी वाद घातला.

Shanti 3

लाथा-बुक्क्यांनी व बांबूने अमानुष मारहाण

वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात नाशिरा मोडक हिने हातातील लाकडी बांबूने आणि लाथा-बुक्क्यांनी ९१ वर्षीय जलेखा मोडक यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत वृद्धेच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जखमी वृद्धेच्या मुलीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून संबंधित आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.