माखनजन, आरवली, करजुवे परिसरातील ग्रामस्थांची मोठी सोय; संगमेश्वर तालुक्यातून थेट सोलापूरच्या अक्कलकोटसाठी सुरू झाली परिवहन महामंडळाची बस
माखजन – संगमेश्वर तालुक्यातून करजुवेसारख्या ग्रामीण भागातून थेट सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये जाण्यासाठी परिवहन महामंडळाची बस सुरू झाली आहे. या नवीन प्रवासी सेवेबद्दल माखनजन, आरवली आणि करजुवे परिसरातून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
बसची वेळ आणि मार्ग
करजुवे येथून सकाळी ६:४५ वाजता ही बस अक्कलकोटला जाण्यासाठी निघणार असून माखनजनमधून ती सकाळी ७:३० वाजता सुटेल.

ही बस पुढे संगमेश्वर-देवरुख मार्गे कोल्हापूर – सांगली – मिरज – सांगोला – पंढरपूर – मोहोळ – सोलापूर मार्गे अक्कलकोट अशी जाणार आहे.
हीच बस याच मार्गाने प्रतिदिन अक्कलकोटहून सकाळी ७:४५ वाजता सुटून करजुवेकडे प्रस्थान करणार असून ही बस देवरुख डेपोची असणार आहे.
तसेच कुरुंदवाड आगाराची कुरुंदवाड-माखनजन अशी बस सेवा पुन्हा सुरू झाली असून, कुरुंदवाडहून सकाळी ६:३० वाजता माखनजनसाठी निघणार आहे. कुरुंदवाडहून सुटल्यावर नृसिंहवाडी – कोल्हापूर – मलकापूर आंबामार्गे देवरुख-माखनजन अशी पोहोचेल, तर हीच बस दुपारी २.४५ वाजता याच मार्गे पुन्हा माखनजन-कुरुंदवाड म्हणून सुटेल.
प्रवाशांकडून स्वागत व बसचे पूजन या बसफेरीच्या उद्घाटनावेळी बसमार्गस्थ होत असताना वाहक व चालकांना प्रवासी संघटनांतर्फे व माखनजन ग्रामपंचायतीतर्फे नारळाचे रोप देण्यात आले. तसेच बसला हार घालून, बसची पूजा करून श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी महेश बाष्टे, संतोष पाडळकर, भाई मोरे, काका तांबे, हरी करंजेकर, सदानंद चव्हाण, अभिजीत सहस्रबुद्धे, कृष्णा पाटील व ग्रामस्थ तसेच वाहक-चालक उपस्थित होते. प्रवासी संघटना माखनजन विभागाचे कार्यध्यक्ष संतोष पाडळकर आणि माखनजन सरपंच महेश बाष्टे यांच्यासह अनेकांनी ही बस सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते













