क्षमतेपेक्षा जास्त माल भरून होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघाताचा मोठा धोका; वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा अभाव
दापोली – दापोली-खेड मुख्य मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक माल भरून अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक करण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशा एका ओव्हरलोड मालवाहू गाडीचा व्हिडिओ आणि वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित वाहतूक यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाच्या या अलिप्त भूमिकेमुळे मालवाहतूकदारांकडून वाहतुकीच्या नियमांना उघडपणे केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जीव मुठीत धरून प्रवाशांचा प्रवास
रविवारी पुन्हा एकदा क्षमतेपेक्षा अधिक माल भरून अतिशय धोकादायक पद्धतीने वाहतूक करणारी एक गाडी महामार्गावर निदर्शनास आली. अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे दापोली-खेड मार्गावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनचालकांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची, मालाचा साठा रस्त्यावर कोसळण्याची किंवा मागील-पुढील वाहनांना जोरदार धडक बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोणाची? – नागरिकांचा सवाल
या धोकादायक वाहतुकीबाबत स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून वारंवार आवाज उठवूनही वाहतूक विभाग आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस कायदेशीर पावले उचलली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या अतिभारित मालवाहू वाहनामुळे महामार्गावर एखादा भीषण अपघात घडून जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिक आणि नियमित प्रवास करणारे वाहनचालक उपस्थित करत आहेत.
नियमित तपासणीची आणि कठोर कारवाईची मागणी
महामार्गावरील संभाव्य प्राणघातक अपघात टाळण्यासाठी संबंधित वाहतूक विभागाने तातडीने अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी. तसेच क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर व मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि या प्रकारांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी महामार्गावर नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.













