बीएमसीने व्हिडिओ हटवल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा हिने आपली बाजू मांडत, हा व्हिडिओ केवळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाढत्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी केल्याचे केले स्पष्ट
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये वाढत्या वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुरू केलेल्या मोहिमेवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या मोहिमेत सहभागी अभिनेत्री दिया मिर्झा हिचा व्हिडिओ मुंबई पालिकेने सोशल मीडियावरून हटवल्यानंतर, आता स्वतः दिया मिर्झाने या संपूर्ण वादावर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. "मी जो व्हिडिओ केला होता, तो प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी होता; त्यात टीका करण्यासारखं किंवा खटकण्यासारखं काय आहे?" असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
"उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच जनजागृती"
एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना दिया मिर्झा म्हणाली की, "सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्याच उद्देशाने मी हा व्हिडिओ केला होता. शहरात प्रदूषण कमी व्हावे आणि लोकांचे आरोग्य उत्तम राहावे हाच त्यामागील मुख्य हेतू होता. यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचे कारण नाही."

व्हिडिओमध्ये नेमके काय होते?
दिवाळीनिमित्त बीएमसीच्या मोहिमेअंतर्गत दिया मिर्झाने नागरिकांना आवाहन करणारा एक विशेष संदेश रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती, "नमस्कार, दिवाळीचा सण जवळ आला आहे. हा उत्सव साजरा करताना आपल्याला पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हींची काळजी घ्यायची आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, यंदाची दिवाळी आवाजाने नाही तर आनंदाने साजरी करा!"
भाजपकडून टीका आणि व्हिडिओ हटवण्याची कारवाई
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या मोहिमेवर आणि दिया मिर्झाच्या सहभागावर तीव्र आक्षेप घेतला होता. "दिवाळी कशी साजरी करावी, हे आम्हाला दिया मिर्झाकडून शिकण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती फार खोलवर रुजलेल्या आहेत," अशी टीका साटम यांनी केली होती. त्यानंतर महापालिकेने दिया मिर्झाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत खात्यावरून काढून टाकला.
दरम्यान, या वादात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झावर कडक शब्दांत टीका करत तिच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे, पालिकेने व्हिडिओ हटवला असला तरी सोशल मीडियावर अनेकांनी तो व्हिडिओ रिपोस्ट करत दिया मिर्झाच्या पर्यावरणाविषयीच्या आवाहन मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.













