मुंबई उच्च न्यायालयात अभिनेत्याने सादर केला बिनशर्त माफीनामा
बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याच्या विरोधात मुंबईत झालेल्या एका आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी बजावण्यात आलेल्या ‘लिव्ह इंडिया’ नोटीसवरून कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. या नोटीशी विरोधात इम्रान खानने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान त्याने न्यायालयात माफी मागत भविष्यात कोणत्याही आंदोलनात सहभागी न होण्याचे आश्वासन दिले आहे.
इमरान खान हा अमेरिकन नागरिक असून त्याच्याकडे भारतात राहण्यासाठी ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (OCI) कार्ड आहे. १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेला (SIR) विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी एफआरआरओ (FRRO) कडून त्याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली असून २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
उच्च न्यायालयाची सुनावणी आणि निरीक्षणे

२ नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान इम्रान खानचे वकील व्यंकटेश धोंड यांनी युक्तिवाद केला की, अभिनेत्याचा कोणत्याही आंदोलक संघटनांशी संबंध नाही, त्याच्यावर कोणतेही गंभीर गुन्हे नसून सर्व कलमे जामीनपात्र आहेत.
दुसरीकडे, राज्य सरकारतर्फे एफआरआरओचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला की, इम्रान खानचा आंदोलनाशी संबंध नाही असा दावा असला तरी त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट, अपलोड केलेली सामग्री आणि त्याने दिलेली मुलाखत यावरून त्याचे तेथील अस्तित्व स्पष्ट होते. तसेच सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोवर्स आहेत.
न्यायालयाचे कडेकोट निर्देश आणि हमीपत्र
इमरान खानच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्याचा जन्म अमेरिकेत झाला असून त्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट आणि ओसीआय कार्ड आहे, परंतु त्याने आपले संपूर्ण आयुष्य, बालपण भारतात घालवले असून यहीं लग्न केले आणि बॉलिवूडमध्ये काम केले. तसेच तो यापुढे कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही, असे लिखित आश्वासन देण्यास तयार आहे.
खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट शब्दांत म्हटले की, "तुम्ही ओसीआय कार्डधारक आहात आणि भारतीय नागरिकाप्रमाणे वागू शकत नाही. तुम्हाला इथल्या घटनांविरोधात भाष्य करण्याचा किंवा आंदोलनात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार नव्हता." न्यायालयाने या प्रकरणी इम्रान खानला माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्या वकिलांनी न्यायालयात हमीपत्रासोबतच बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी होणार आहे.













