सल्ले देण्यासाठी हिंदू सणच मिळतात, दिया मिर्झासारखे..; भाजप नेते नितेश राणे आक्रमक
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना फटाके न उडवता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. हा जनजागृती संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बीएमसीनं बॉलिवूड व क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेतली होती. यामध्ये दिया मिर्झा, माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचे आवाहन करणारे व्हिडिओ तयार केले होते. मात्र, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अभिनेत्री दिया मिर्झाच्या या मोहिमेतील सहभागावर आक्षेप घेतल्यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे.
अमित साटम यांचा आक्षेप आणि बीएमची माघार
अमित साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिया मिर्झा यांच्या सहभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. "दिवाळी कशी साजरी करावी, हे दिया मिर्झाकडून शिकण्याची आम्हाला गरज नाही, कारण आपल्या परंपरा संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत," असे त्यांनी म्हटले होते. साटम यांच्या या भूमिकेनंतर वाद वाढल्याने बीएमसीनं तात्काळ दिया मिर्झा यांचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवला. मात्र, हा व्हिडिओ नेमका कशामुळे काढूनण्यात आला, याचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आलेले नाही, ज्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांची तीव्र प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "पर्यावरण हे फक्त हिंदूंच्या सणांच्या वेळीच, म्हणजेच होळी आणि दिवाळीच्या वेळीच कसे खराब होते? ईद, मोहरमच्या काळात किंवा बकरे कापताना तसेच मोहरममध्ये प्राण्यांना इजा पोहोचवली जाते, तेव्हा पर्यावरण खराब होत नाही का? रमजानच्या वेळी सर्वत्र घाण होते, तेव्हा पर्यावरण बिघडत नाही का? हिंदू सणांच्या वेळीच असे सल्ले देण्यासाठी हे लोक पुढे येतात."
दिया मिर्झासारखे लोक सातत्याने हिंदू धर्मावर टीका करण्याचे प्रयत्न करत असतात, आणि त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रोत्साहन दिले जात असेल, तर या गंभीर बाबीसंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.













