पालकमंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाट्यसंस्था व कलाकारांनी शिंदेवाडीत जलसंधारणाच्या कामात दिले मोलाचे योगदान
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या पुढाकाराने पानवल येथील विविध नाट्यसंस्था आणि रंगकर्मींनी शिंदेवाडी येथे ‘विजय बंधारा’ यशस्वीरीत्या बांधून पूर्ण केला.
उत्सवी नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नाट्यसंघाने आपापल्या गावात विजय बंधारे बांधून जलसंधारणाच्या कामात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पानवल येथील सर्व नाट्य संस्था आणि रंगकर्मी एकत्र आले आणि त्यांनी श्रमदानातून शिंदेवाडी येथे बंधारा बांधण्याचे काम फत्ते केले. नाट्यकलेच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच नाही, तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम या उपक्रमाद्वारे कलाकारांनी करून दाखवले आहे.
प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य

या सामाजिक उपक्रमासाठी स्थानिक प्रशासनाकडूनही मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामसेविका पंगेरकर आणि सहायक कृषी अधिकारी नीलेश कांबळी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन व मदत केली. तसेच पानवल ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनीही या कामात मोलाचे योगदान दिले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांच्या विशेष पुढाकाराने हा उपक्रम पार पडला. बंधारा बांधणीच्या वेळी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य, उत्सवी नाट्य स्पर्धेचे परीक्षक आणि पानवल परिसरातील विविध नाट्यसंस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.













