Kumbharli Ghat road repair: कुंभार्ली घाट रस्त्याची डागडुजी सुरू

Kumbharli Ghat road repair: कुंभार्ली घाट रस्त्याची डागडुजी सुरू

मनसे वाहतूक जिल्हाध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग; खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात

चिपळूण – राष्ट्रीय महामार्ग विभागाने कुंभार्ली घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत इशारा दिल्यानंतर सुस्तावलेली यंत्रणा अखेर कामाला लागली आहे.

अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कुंभार्ली घाटात अवघड वळणावर रस्त्याला मोठे खड्डे पडले होते. छोट्या चारचाकी गाड्यांना या ठिकाणी जाता-येताना मोठी कसरत करावी लागत होती. या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या परजिल्ह्यातील ठेकेदाराने खड्डे भरण्याऐवजी संरक्षक भिंती घालण्यास सुरुवात केली होती. प्रवासी व वाहनचालकांनी अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले होते, तर ठेकेदार मात्र सर्वत्र भिंती उभ्या करीत राहिला, मात्र खड्ड्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

मनसेचा इशारा आणि प्रशासनाची हलचल

Shanti2

या संदर्भात मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंता पाटील यांची आठ दिवसांपूर्वी भेट घेतली होती. यावेळी जर खड्डे आठ दिवसांत भरले गेले नाहीत तर ठेकेदाराला काम करू देणार नाही, असा सज्जड इशारा देण्यात आला होता.

त्यानुसार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सक्त ताकीद देऊन खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचना केली. त्यानुसार सोमवारपासून खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भातील आंदोलन स्थगित करण्यात आले असून, मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी पाटील यांचे आभार मानले आहेत.

रस्त्याच्या दर्जाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, मात्र या मार्गाकडे संबंधित यंत्रणा नेहमीच दुर्लक्ष करत असते, त्यामुळे हा रस्ता नेहमीचा धोकादायक होत असतो. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देऊन काम करून घ्यावे, अशी विनंतीही राजू खेतले यांनी केली आहे.