केवायसी (KYC) प्रक्रियेतील अडचणी दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणर
राज्यातील कर्जमाफीच्या यादीतून एकाही शेतकऱ्याचे नाव सुटणार नाही, असा ठाम विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. केवायसी (KYC) पूर्ण करून याद्या तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून, या कर्जमाफीच्या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी सरकार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यात १० ते १५ हजार शेतकरी कुटुंबांचे केवायसी होणे अद्याप बाकी आहे, हे मान्य करत ते म्हणाले की, काही ठिकाणी मृत आई-वडिलांच्या नावावर खाती असल्याने ती मुलांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. मात्र, शेतकरी कर्जमाफीची योजना सरकार पूर्ण करणार असून कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही.
दुष्काळात सक्तीची वसुली करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर केली जाणारी सक्तीची वसुली थांबवण्यासंदर्भात महसूलमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. "दुष्काळाच्या या आठ महिन्यांत शेतकऱ्यांना सक्तीच्या वसुलीसाठी तगादा लावू नका. पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांनी शेतकऱ्यांना या कठीण काळात वेठीस धरू नये. तुमचे पैसे नंतर मिळतील, परंतु शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल अशी कोणतीही कृती करू नका," अशा कडक सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही कोणी सक्तीची वसुली करत असल्यास शासन म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

इतर राजकीय आणि प्रशासकीय मुद्यांवर भाष्य
राष्ट्रवादी-अमित शाह भेट: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेल्या भेटीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, "उच्चस्तरीय बैठकीत जे काही ठरले असेल, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील."
नागपूर बिश्नोई गँग धमकी प्रकरण: या प्रकरणी पोलीस वेगाने चौकशी करत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याची गंभीर दखल घेतली आहे. सरकार यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे, असे त्यांनी नमूद केले.
तुकाराम मुंढे प्रकरण: तुकाराम मुंढे यांच्या कारवाईत कोणतीही स्थगिती दबावाखाली आलेली नाही. तांत्रिक बाबी राहून गेल्यामुळे एखाद्या वेळेस कारवाई थांबवली जाऊ शकते, परंतु त्यांच्या कामात कोणीही अडथळा आणत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी आरक्षणावरून वडेट्टीवारांवर टीका: जिल्हा परिषद निवडणुकांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली. वडेट्टीवार नौटंकी करत असून २७ टक्के आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात गेले, असा आरोप त्यांनी केला. हे आरक्षण परत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची तयारी सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.













