गुरुवारपासून धावणार अतिरिक्त एसटी बसेस; ६ ते १४ नोव्हेंबर दरम्यान एसटी महामंडळाचे विशेष नियोजन
रत्नागिरी – दिवाळी सण काहीच दिवसांवर येऊन ठेपला असून दिवाळीसाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने तब्बल ६५० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबरपासून या एसटी बसेस पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे येथे धावणार आहेत. याानिमित्त दिवाळी सणासाठी रत्नागिरी विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे.
चाकरमान्यांसाठी विशेष गाड्यांची सोय
नोकरीनिमित्त इतर जिल्ह्यांत असलेले चाकरमानी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त प्रत्येक जण आपल्या मूळ गावी हमखास जातो. ५ नोव्हेंबरपासून शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. काही जण मूळ गावी, पर्यटनाला, तर कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी आपल्या हक्काच्या ‘लालपरी’लाच पसंती देतात. हीच गरज ओळखून रत्नागिरी विभागाच्या वतीने दररोज ३० अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील चाकरमानी व प्रवाशांनी आताच तिकीट आरक्षण करून घ्यावे, असे आवाहन एसटी विभागाने केले आहे.

कुठे कुठे धावणार गाड्या?
रत्नागिरी आगारातून तुळजापूर, पंढरपूर, सोलापूरसह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे बसेस सोडण्याचे नियोजन आहे. तसेच मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यांमध्ये दिवाळीनिमित्त गाड्या धावणार आहेत.
"रत्नागिरी आगारातून तुळजापूर, पंढरपूर, सोलापूरसह इतर ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी आगाराच्या वतीने याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे."
— बालाजी आडसुळे (रत्नागिरी आगार, रत्नागिरी)
*सवलत मिळणार, मात्र एनसीएमसी (NCMC) कार्ड बंधनकारक
*
दिवाळीनिमित्त तरुणी, महिला, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना १०० टक्के सवलत (मोफत प्रवास) लागू असणार आहे. मात्र, सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड बाळगणे बंधनकारक असणार आहे. प्रवाशांनी हे कार्ड जवळ बाळगावे व रिचार्ज करून ठेवावे, कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे.













