कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत तापमान १४ ते १७ अंशांपर्यंत खाली येण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज
कोल्हापूर :
लक्ष्मीपूजनानंतर राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात थंडीची पहिली लाट अनुभवायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील दख्खनचा भाग आणि मराठवाड्यात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. ९ नोव्हेंबरपासून गारवा वाढण्याची शक्यता असून १४ नोव्हेंबरपर्यंत तापमानात मोठी घट दिसून येऊ शकते.
‘अल निनो’चा प्रभाव आणि बदलणारे हवामान

यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे कडाक्याची आणि हुडहुडी भरवणारी थंडी कमी दिवसांपुरतीच मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. कडाक्याच्या थंडीचा दीर्घ मुक्काम नसून, अधूनमधून थंडीचे छोटे-छोटे स्पेल (टप्पे) पाहायला मिळतील. वातावरणातील आर्द्रतेचे प्रवाह आणि पूर्वेकडून वाहणारे वारे यामुळे तापमानात चढ-उतार सातत्याने होत राहतील. विशेषतः नोव्हेंबरच्या मध्यावर थंडीच्या सत्रानंतर पुन्हा उबदार हवामानाचा अनुभव येऊ शकतो.
नोव्हेंबरअखेर अवकाळी पावसाची शक्यता
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची फेरी येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आर्द्रतेचे प्रवाह आणि वाऱ्यांची बदलते दिशा यांमुळे काही भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे यंदाच्या नोव्हेंबरमधील हवामान केवळ थंडीपुरते मर्यादित न राहता ऊन, गारवा आणि अवकाळी पाऊस या तिन्ही घटकांच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.













