एज्युस्पार्क कंपनीचा डेटा लीक प्रकरणात सहभाग असल्याचा संशय; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई:
महाराष्ट्रातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेत तसेच राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षेत (CET) मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या कथित घोटाळ्यामुळेच गेल्या काही वर्षांत पुण्यातील ‘सीओईपी’ (COEP) या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाची राष्ट्रीय रँकिंग घसरल्याचा दावाही त्यांनी केला.
२,३०० कोटींची कामे आणि डेटा लीक प्रकरणाचा संशय
सीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांचा डेटा लीक प्रकरणात ‘एज्युस्पार्क’ (Eduspark) कंपनीचा थेट सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत, रोहित पवार यांनी या कंपनीला राज्यात तब्बल २,३०० कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली असली, तरी प्रत्यक्षात तपासात कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही, असा दावा त्यांनी केला.

एज्युस्पार्क कंपनीला पहिल्यांदा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून उदय सामंत यांच्या कार्यकाळात काम देण्यात आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातही याच कंपनीला कामे पुरवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कंपनीला कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणत्या निकषांवर एवढ्या मोठ्या रक्कमेची कामे देण्यात आली, असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
स्टिंग ऑपरेशन सादर: टॉप कॉलेजमधील प्रवेशासाठी २५ लाखांचा दर
कथित गैरप्रकार उघड करण्यासाठी रोहित पवार यांनी एका शिक्षकाने केलेले ‘स्टिंग ऑपरेशन’ पत्रकारांसमोर सादर केले. या स्टिंगमध्ये शिक्षक नारायण शिंगारे यांनी सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळवून देणे आणि नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेची मागणी केली जात असल्याचे उघड केले.
शिंगारे यांच्या दाव्यानुसार, सुभेंदू प्रभात नावाच्या व्यक्तीच्या सुमारे सात कंपन्या असून, लखनौ येथून या कंपन्यांचे कामकाज चालवले जाते. संबंधित व्यक्तीने स्वतःला एका मंत्र्याचा भाऊ असल्याचे सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नारायण शिंगारे यांनी याबाबत स्थानिक पोलीस ठाणे आणि एसआयटीकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
शिक्षण व्यवस्थेतील हा कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत रोहित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी केली आहे. सीईटीसारख्या राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेतील पारदर्शकतेवरच या गंभीर आरोपांमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.













