राज्यातील २२ जिल्हा सत्र न्यायालयांना मिळालेल्या धमकीच्या ई-मेलनंतर रत्नागिरीत सुरक्षा यंत्रणा सतर्क
रत्नागिरी:
महाराष्ट्रातील २२ जिल्हा सत्र न्यायालयांना सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर, मंगळवारी रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सोमवारी संपूर्ण न्यायालय परिसरात घेतलेल्या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाले आहे; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य प्रवेशद्वारांवर कडक तपासणी व्यवस्था आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चार सशस्त्र पोलिसांचा गार्ड तैनात आणि मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवारी सकाळपासूनच रत्नागिरी न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. न्यायालयाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले असून, चार सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र गार्ड तैनात करण्यात आला आहे. न्यायालयात येणाऱ्या वकील, पक्षकार तसेच इतर सर्व नागरिकांची मेटल डिटेक्टरद्वारे कडक तपासणी केल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे.

बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून पाहणी व सायबर पोलिसांकडून तपास
सोमवारी अज्ञाताने पाठवलेल्या ई-मेलनंतर पोलिस, बॉम्बशोधक-नाशक पथक आणि श्वान पथकाने रत्नागिरी न्यायालय परिसराची कसून तपासणी केली होती. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. धमकीच्या ई-मेलमुळे सुरुवातीला न्यायालयीन कामकाज काही काळ विस्कळीत होऊन उशिराने सुरू झाले होते तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मंगळवारी वाढवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे सुरळीत पार पडले. दरम्यान, हा धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सायबर पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.













