पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश
रत्नागिरी:
डेंग्यूसारख्या आजारात प्लेटलेट्सची तातडीची आवश्यकता निर्माण झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी पायपीट आणि धावपळ लक्षात घेऊन, रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तकेंद्रात प्लेटलेट्स अफेरेसिस (Apheresis) मशीन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी रक्तकेंद्रातील ही मशीन तातडीने सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. या सूचनेची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने यंत्रणा तत्काळ कार्यान्वित केली असून, यामुळे आरोग्यसेवेचा एक दिलासादायक अनुभव समोर आला आहे.
मशीन सुरू होताच पहिले सिंगल डोनर प्लेटलेट्सदान संपन्न
अफेरेसिस मशीन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रत्नागिरीतील पराग पाटील यांनी स्वतःहून पुढे येत सिंगल डोनर प्लेटलेट्ससाठी (SDP) रक्तदान केले. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय व तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या दानातून संकलित करण्यात आलेल्या प्लेटलेट्स २ नोव्हेंबर रोजी चिंतामणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रेणा प्रशांत जाधव या डेंग्यूग्रस्त रुग्णाला तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या. या सुविधेमुळे आता गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.














