विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे मांडले आकर्षक स्टॉल्स; पुस्तकी ज्ञानासह प्रत्यक्ष व्यवहाराचे मिळाले धडे
चिपळूण:
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यवहारज्ञान, व्यावसायिक दृष्टिकोन आणि उद्योजकतेची ओळख व्हावी, या उद्देशाने मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या कै. सौ. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मार्गताम्हाणे येथे अकरावी व बारावी वाणिज्य विभागाच्या वतीने ‘दिवाळी बाजार’ या अभिनव उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील रुक्मिणी गणपत चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उत्पादनाचे सादरीकरण, किंमत निश्चिती आणि विक्री व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव
वाणिज्य विभागाच्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला व्यावसायिक कौशल्याची जोड देत विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. यात दिवाळी फराळ, विद्यार्थ्यांनी स्वतः रंगवलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू आणि विविध हस्तकला साहित्याचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वस्तूंची निवड, उत्पादनाचे सादरीकरण, किंमत निश्चिती, जाहिरात, ग्राहकांशी संवाद, विक्री व्यवस्थापन आणि नफा-तोट्याचे गणित यांसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. पुस्तकी अभ्यासापलीकडे जाऊन बाजारपेठेचे व्यवहार कसे चालतात, ग्राहकांच्या गरजा कशा ओळखायच्या आणि व्यवसायाचे नियोजन कसे करायचे, याचे उत्तम प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण, नियोजन कौशल्य आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मोठी मदत झाली. स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री करताना विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भाऊ लकेश्री, पर्यवेक्षक विनोद पवार, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सौ. वर्षा भोबस्कर, प्रा. सौ. तन्वी भागवत, प्रा. सौ. भारती येवले आणि श्रीमती शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बारावी वाणिज्य शाखेचे गटप्रमुख गौरव शिर्के, आयुष पेजले, शुभ्रा चव्हाण, सानिका बोबले, दीक्षा बोबले आणि श्रावणी जाधव यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. ‘शिका, अनुभव घ्या आणि उद्योजकतेकडे वाटचाल करा’ हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत कौतुकास्पद ठरला आहे.













