Pune Metro Line Inauguration : सरकार महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही

Pune Metro Line Inauguration : सरकार महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन; पंतप्रधान मोदींनी मराठीतून साधला संवाद

पिंपरी:

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी एनडीए (NDA) सरकार खंबीरपणे उभे असून त्यांच्या कुटुंबांची दिवाळी आनंदी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो मार्गिका टप्पा तीनचे उद्घाटन आणि पुणे मेट्रो टप्पा दोनमधील विस्तारित चार नव्या मार्गांचा भूमिपूजन सोहळा म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून मेट्रोचे उद्घाटन केले व उपस्थितांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला ऑनलाईन माध्यमातून राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तर व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Arihant 3

Pune Metro Line Inauguration : आयटी क्षेत्राला उत्तम कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील मोठ्या आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच शहरांमधील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल. पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, स्टार्टअप, नवोपक्रम व उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनले असून मेट्रोच्या वाढत्या सुविधांमुळे शहराच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि मराठीतून संवाद
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील दुष्काळात होरपळून निघालेल्या बळीराजाला दिलासा देत "आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत", असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने अग्रिम मदत दिल्याचे तसेच ‘पीएम किसान’ निधी जमा झाल्याचे त्यांनी नमूद केले. दिवाळीच्या सणात दुष्काळग्रस्त व संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या घरात आनंद निर्माण करण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

अर्बन चॅलेंज फंडातून महाराष्ट्रातील कामांना गती देण्याचे आवाहन
देशातील शहरांना विकासाची मंदिरे व केंद्रे बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या ‘अर्बन चॅलेंज फंडा’ला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून आगामी काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होणार आहे. या निधीचा वापर करून महाराष्ट्र राज्याने विकासकामांचा विस्तार करण्याबरोबरच कामांना अधिक गती द्यावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात केले.