वसुबारस ते भाऊबीज; जाणून घ्या पूजेच्या वेळा आणि खरेदीचे अमृत योग
ज्या सणाची अवघा देश आतुरतेने वाट पाहत असतो, तो दिव्यांचा आणि आनंदाचा उत्सव म्हणजे दिवाळी! यंदा ५ नोव्हेंबर २०२६ पासून या मंगलमय दीपोत्सावाला सुरुवात होणार असून ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेने सणाची सांगता होणार आहे. दिव्यांची आरास, आकर्षक रांगोळ्या, उटण्याचा सुगंध आणि लक्ष्मीपूजनाचा सोहळा यामुळे संपूर्ण आठवडा आनंदात घालवण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. विशेष म्हणजे यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी (८ नोव्हेंबर) आले आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सर्व सणांच्या तारखा आणि शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत:
१. वसुबारस (गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६)
दिवाळी उत्सवाची सुरुवात वसुबारसने होते. या दिवशी गाई आणि वासराची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.

पूजा मुहूर्त: सायंकाळी ५:३६ ते रात्री ८:११
२. धनत्रयोदशी / धनतेरस (शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६)
या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून सोने, चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.
लक्ष्मी-कुबेर पूजन: सायंकाळी ६:३२ ते रात्री ८:३१
यमदीपदान मुहूर्त: सायंकाळी ५:४५ ते रात्री ७:२०
खरेदीचे शुभ मुहूर्त:
सकाळी ८ ते ११ (लाभ-अमृत योग)
दुपारी १२:३० ते २ (शुभ योग)
रात्री ९:३० ते ११ (लाभ योग)
३. नरक चतुर्दशी (रविवार, ८ नोव्हेंबर २०२६)
या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान केले जाते. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून अन्यायावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
अभ्यंगस्नान मुहूर्त: पहाटे ५:३४ ते सकाळी ६:३३
४. लक्ष्मीपूजन (रविवार, ८ नोव्हेंबर २०२६)
यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. या दिवशी घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी सरस्वतीची पूजा केली जाते.
लक्ष्मीपूजन मुख्य मुहूर्त: सायंकाळी ६:२६ ते रात्री ८:२६
शुभ-अमृत योग: सायंकाळी ६:३० ते रात्री ९:३०
५. दिवाळी पाडवा / बलिप्रतिपदा (मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६)
पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि समर्पणाचा हा सण आहे. या दिवशी राजा बळी आणि विष्णूच्या वामन अवताराचे स्मरण केले जाते.
पाडवा पूजा वेळ: सकाळी ९:२५ ते दुपारी १:३२
शुभ मुहूर्त:
सकाळी ११ ते दुपारी २ (लाभ-अमृत योग)
दुपारी ३:३० ते सायंकाळी ५ (शुभ योग)
६. भाऊबीज (बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६)
भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
ओवाळणी मुहूर्त: दुपारी १:३० ते ३:४५ (टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)













