गोळवली ते तुरळ दरम्यान मृतावस्थेत आढळलेल्या मादी बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल समोर
देवरुख:
नजरेत भक्ष्य टिपण्याची ताकद, पावलांत विजेचा वेग आणि दबा धरून शिकार करण्याची अफलातून कला असलेला बिबट्या – ज्याच्या चाहुलीने संपूर्ण जंगलात इतर प्राण्यांची पळापळ उडते, त्याच बिबट्याचा शेवट एका विषारी सापाच्या दंशाने व्हावा, असा अत्यंत अनपेक्षित आणि चकित करणारा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरात समोर आला आहे. दुसऱ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी भटकणारी मादी बिबट्या स्वतःच सर्पदंशाची शिकार ठरली असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मृतावस्थेत आढळलेल्या या बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे.
महामार्गावर आढळला मृतदेह आणि वनविभागाची धाव

रविवारी मध्यरात्री गोळवली ते तुरळ दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी एक मादी बिबट्या मृतावस्थेत पडून असल्याचे एका प्रवाशाच्या निदर्शनास आले. रात्रीच्या अंधारात महामार्गावर मृत वन्यजीव पाहून प्रवाशाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील वैधानिक तपासणीसाठी साडवली येथे पाठवला.
Leopard Snake Bite Death : वाहनाची धडक की सर्पदंश? शवविच्छेदनातून सत्य बाहेर
महामार्गाच्या मध्यभागी बिबट्याचा मृतदेह आढळल्याने सुरुवातीला एखाद्या अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र साडवली येथे साखरपा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल तपासणीनंतर संपूर्ण घटनाक्रम बदलला. बिबट्याच्या शरीरावर वाहनाच्या धडकेच्या कोणत्याही ठळक खुणा आढळल्या नाहीत आणि त्याचे अंतर्गत अवयवही सुस्थितीत असल्याचे दिसून आले. अखेर सविस्तर शवविच्छेदन अहवालात या मादी बिबट्याचा मृत्यू विषारी सापाच्या दंशानेच झाल्याचे निष्पन्न झाले.
निसर्गाच्या नियमाचे दर्शन आणि हळहळ
आपली चपळाई, निसर्गदत्त ताकद आणि शिकारीच्या कौशल्यामुळे बिबट्याला जंगलातील सर्वात प्रभावी शिकारी मानले जाते. मात्र निसर्गाच्या दरबारात कोणताही जीव कायमचा शक्तिशाली नसतो, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. जंगलातील बलाढ्य मानल्या जाणाऱ्या प्राण्याला एका सापाच्या दंशाने जीव गमवावा लागल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून वन्यजीव प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.













