६७४ विशेषज्ञ आणि ७६६ एमबीबीएस डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मिळणार दिलासा
मुंबई:
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी भरतीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) संवर्गातील १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरित करण्याचा विशेष समारंभ ४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
२ हजार ५१४ पैकी १ हजार ४४० पदांची भरती प्रक्रिया पूर्ण
राज्यातील वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण २ हजार ५१४ पदांपैकी १ हजार ४४० पदांसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी निवडले गेले आहेत. विशेषज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्यांमुळे ग्रामीण रुग्णालयांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत विविध विशेष उपचार सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, तर एमबीबीएस डॉक्टरांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील नियमित रुग्णसेवा अधिक सक्षम होईल.

ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना मोठा दिलासा
ग्रामीण आणि आदिवासी भागात डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागत होती. नवीन नियुक्त्यांमुळे अपघात, प्रसूती, सर्पदंश आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिकांवर योग्य उपचार होणे शक्य होईल. तसेच, सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी होऊन शासकीय रुग्णालयांमधील उपचारांची गुणवत्ता आणि नागरिकांचा विश्वास वाढण्यास मदत मिळणार आहे.













