राजे सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार; शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींच्या श्रमदानातून गड परिसर तणमुक्त
चिपळूण :
चिपळूणचा ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या गोवळकोट येथील प्रसिद्ध दुर्ग गोविंदगडच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या स्वच्छता व संवर्धन मोहिमेचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. दुर्गप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागाने या मोहिमेची दमदार सुरुवात झाली आहे.
दुर्ग गोविंदगडच्या संवर्धनाचे कार्य राजे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने आणि अत्यंत निष्ठेने सुरू आहे. या मोहिमेची सुरुवात सकाळी ७:३० वाजता गडावरील गडदेवता आई रेडजाई मातेचे आणि हत्यारांचे विधिवत पूजन करून करण्यात आली. या धार्मिक पूजनानंतर उपस्थित शिवप्रेमींनी प्रेरणामंत्र घेत प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.
या मोहिमेदरम्यान गडावरील तटबंदी, बुरूज आणि इतर ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील झाडोपांची स्वच्छता करण्यात आली. गडाच्या आतील आणि बाहेरील भागातील बुरूज व तटबंदीलगत वाढलेली बाभळीची व अन्य काटेरी झुडुपे, गवत आणि अनावश्यक वनस्पती मोठ्या मेहनतीने हटवण्यात आल्या. तसेच गवताने व्यापलेला सदर्रेचा (सहाण) परिसर पूर्णपणे स्वच्छ करून मोकळा करण्यात आला.

ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे आणि गडाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याঁसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, छावा प्रतिष्ठान यांसारख्या विविध सामाजिक व शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्रित येऊन केलेल्या श्रमदानामुळे गोविंदगड परिसराचे रूपडे पालटले असून, या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













