Mahavitaran Rajapur News: महावितरणची देखभाल-दुरुस्ती शनिवार-रविवारी करा; राजापूरवासीयांची मागणी

Mahavitaran Rajapur News: महावितरणची देखभाल-दुरुस्ती शनिवार-रविवारी करा; राजापूरवासीयांची मागणी

सोमवारी वीजपुरवठा खंडित होत असल्याने शासकीय कामकाज आणि नागरिकांची गैरसोय; लांजेकर, जैतापकरांचे निवेदन

राजापूर :
महावितरणकडून दर सोमवारी वीजवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने राजापूर शहरातील शासकीय कार्यालये आणि नागरिकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे सोमवारऐवजी ही देखभाल-दुरुस्तीची कामे शनिवार किंवा रविवारी करावीत, अशी ठाम मागणी राजापूरवासीयांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात २ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या राजापूर उपविभाग-१ च्या उपअभिंक्त्यांकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. अरविंद अशोक लांजेकर आणि अजिम इब्राहिम जैतापककर यांनी हे निवेदन सुपूर्द केले. महावितरणतर्फे दर सोमवारी वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती केली जाते, ज्यासाठी काही काळ वीजपुरवठा बंद ठेवावा लागतो. मात्र, या दिवशी तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, नगरपंचायत आणि गटविकास अधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजात अडथळे निर्माण होतात आणि खासगी आस्थापनांनाही त्याचा फटका बसतो.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीजपुरवठा बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागातून शासकीय कामांसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. वीज नसल्यामुळे त्यांची कामे रखडतात आणि त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. नागरिकांचा हा मनस्ताप टळावा, यासाठी महावितरणने देखभाल-दुरुस्तीचे वेळापत्रक बदलावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महावितरणने या मागणीचा सकारात्मक विचार करून सोमवारऐवजी शनिवार किंवा रविवारी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Infigo eyecare