चिपळूण: ‘नाम’ फाऊंडेशन, अनुलोम संस्था आणि चोरवणे ग्रामस्थांच्या सहकार्यातून टेकवणे नदीवर ‘विजयी बंधारा’ पूर्ण

चिपळूण: 'नाम' फाऊंडेशन, अनुलोम संस्था आणि चोरवणे ग्रामस्थांच्या सहकार्यातून टेकवणे नदीवर 'विजयी बंधारा' पूर्ण

जलसाठा अभियानांतर्गत श्रमदानातून उभारला बंधारा; दुष्काळमुक्तीसाठी ग्रामस्थांचा प्रेरणादायी पुढाकार

चिपळूण :
गावाचा विकास हा केवळ शासकीय योजनांवर अवलंबून नसून त्यासाठी गावकऱ्यांची एकजूट, सामूहिक प्रयत्न आणि गावाबद्दलची आपुलकी अत्यंत महत्त्वाची असते, याचा प्रत्यय चिपळूण तालुक्यातील चोरवणे गावात आला आहे. ‘नाम जलसाठा अभियानांतर्गत’ चोरवणे-निवे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, नाम फाऊंडेशन आणि अनुलोम संस्थेच्या विशेष सहकार्यातून चोरवणे गावातील टेकवणे नदीवर ‘विजयी बंधारा’ अत्यंत यशस्वीरीत्या बांधण्यात आला आहे.

या जलसंधारण उपक्रमात ‘नाम फाऊंडेशन’च्या वतीने मशीनचे सहकार्य आणि जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला, तर बंधाऱ्यासाठी लागणारे डिझेल चोरवणे-निवे ग्रामपंचायतीने εरले. नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रथमेश पोर्‍मडेकर, शाहनवाज शाह, अनुलोम संस्थेचे मयेश पाटणकर व ज्ञानेश्वर (ग्रामपंचायत ग्रामसेवक), तसेच गणेश पाडवी (माजी उपसरपंच), प्रवीण सावंत आणि शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख जगताप यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली या विजयी बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे, या कामात ग्रामस्थांच्या, प्रामुख्याने महिलांच्या कठोर परिश्रमातून व श्रमदानातून हा बंधारा सलग ३ दिवसांत पूर्ण करण्यात आला. तसेच ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी व सभासदांनीही गावात येऊन ग्रामस्थांसोबत श्रमदानात सहभाग घेतला.

श्रमदानाची वैशिष्ट्ये आणि रचना:

Horizon techno.

गाळ उपसा व खोलीकरण: कामांतर्गत नदीपात्रातील संपूर्ण गाळ आणि दगड काढून नदीची खोली ५ ते ६ फूट वाढवण्यात आली.

आकारमान: साधारणपणे ७० बाय १० फूट क्षेत्रफळाचा हा मजबूत बंधारा बांधण्यात आला.

तंत्रज्ञान: बंधाऱ्याला योग्य प्रकारे पिचिंग करून त्यावर पहिल्या थरात माती टाकण्यात आली. त्यानंतर प्लॅस्टिक टाकून दुसऱ्या थरात पुन्हा माती टाकून तो मजबूत करण्यात आला.

दुष्काळमुक्तीचा दृढ संकल्प:
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे स्वप्न आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी ‘नाम’च्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिथे लोकांची गरज आहे आणि लोकसहभाग मिळेल, अशा ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी नाम फाऊंडेशनतर्फे मोफत मशीन्स व साधनसामग्री दिली जात असून, इंधनाची व्यवस्था लोकसहभागातून केली जाते.

हा विजयी बंधारा केवळ जलसंधारणच करणार नाही, तर गावकऱ्यांमध्ये एकजूट, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करेल. ज्या ग्रामपंचायतीमधील बंधारा किंवा नाला गाळ काढून पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी किंवा भूजल साठा वाढवण्यासाठी आवश्यक आहे, त्यांनी प्रथमेश पोर्‍मडेकर (९५६१३२९२६०) किंवा शाहनवाज शाह (९८२२८२०३९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर गावांमध्येही असेच जलसंधर्नाचे उपक्रम राबवले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.