टपाल वितरण, स्पीड पोस्ट व बचत बँकेविषयीच्या तक्रारींवर होणार थेट सुनावणी
रत्नागिरी / चिपळूण:
कोकणातील नागरिकांच्या टपाल सेवेशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी चिपळूण विभागीय डाकघर अधीक्षकांतर्फे येत्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय स्तरावरील ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. ही डाक अदालत चिपळूण नगरपरिषदेसमोरील डाकघर अधीक्षक कार्यालयात पार पडणार आहे.
पोस्टाच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित ज्या तक्रारींचे दीर्घकाळापासून किंवा स्थानिक पातळीवर निराकरण झालेले नाही, तसेच ज्या तक्रारींवर ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा प्रकरणांची या अदालतीमध्ये थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने टपाल वितरण (Post Delivery), स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, टपाल बचत बँक (Postal Savings Bank) आणि मनीऑर्डरविषयक तक्रारींचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.
या डाक अदालतीसाठी काही महत्त्वाच्या अटी व नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार एका व्यक्तीने केवळ एकाच तक्रारीसाठी अर्ज करायचा आहे. तक्रार अर्जात संपूर्ण वस्तुस्थिती, अनुक्रमांक आणि आवश्यक तपशील स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. नागरिकांनी आपले तक्रार अर्ज "अधिक्षक डाकघर कार्यालय, चिपळूण, चिपळूण नगरपरिषदेसमोर, चिपळूण" या पत्त्यावर ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्ष अथवा टपालाने पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा या अदालतीत विचार केला जाणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे चिपळूण डाक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.














