Maharashtra Loksewa Hakka Adhiniyam Ratnagiri: ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे सेवा देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राज्यात पुन्हा एकदा अव्वल!

Maharashtra Loksewa Hakka Adhiniyam Ratnagiri: 'आपले सरकार' पोर्टलद्वारे सेवा देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राज्यात पुन्हा एकदा अव्वल!

ऑक्टोबर २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि नागरिकांच्या समाधानात पटकावला प्रथम क्रमांक

रत्नागिरी:
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत ‘आपले सरकार पोर्टल’द्वारे नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा पारदर्शक आणि जलद गतीने पुरवण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ऑक्टोबर २०२६ या महिन्यात पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावून आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. एकूण कामगिरी आणि नागरिकांच्या समाधानाच्या गुणांकनात जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील विविध शासकीय विभागांच्या ऑनलाइन सेवांचे नियमितपणे मूल्यमापन केले जाते. या मूल्यमापनात रत्नागिरी पोलीस दलाने ‘मिशन रॅपिड’ (Mission Rapid) अंतर्गत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. ऑक्टोबर महिन्यात ‘ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्व्हिस’ (Overall Top Performing Service) आणि ‘सर्व्हिस विथ हायेस्ट सिटिझन स्कोअर’ (Service with Highest Citizen Score) या दोन्ही महत्त्वाच्या श्रेणींमध्ये रत्नागिरी पोलीस दलाने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला.

आकड्यांचा विचार करता, ऑक्टोबर महिन्यात जिल्हा पोलीस दलाकडे विविध शासकीय सेवांसाठी एकूण १ हजार ९८० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ८७३ अर्जांचा विहित वेळेत अत्यंत तत्परतेने निपटारा करण्यात आला. वेळेत आणि गुणवत्तेसह सेवा देण्याच्या निकषावर १० पैकी ९.२८ एवढे उच्च गुणांकन मिळवत पोलीस दलाने आपली आघाडी कायम ठेवली आहे. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन रॅपिड’च्या यशस्वी अंमलबजावणीमुळेच हे यश शक्य झाले असून, भविष्यातही नागरिकांना अधिक प्रभावी व तत्पर सेवा देण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध राहील, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Horizon techno.