Ratnagiri : समृद्ध कोकण संघटना, स्वराज्यभूमी कोकण आंदोलकांचा जयस्तंभ येथे रास्ता रोको

◼️ सहाव्या दिवशी उपोषण स्थगित

रत्नागिरी : कोकणातील पर्यटन, मच्छीमार, कृषी क्षेत्रावर झालेल्या अन्यायासाठी विरोधात समृद्ध कोकण संघटना, स्वराज्यभूमी कोकण आंदोलन यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेले आमरण उपोषण मंगळवारी सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी जयस्तंभ येथे रास्ता रोको करत स्वायत्त कोकण झाला पाहिजे अशा घोषणा दिल्या. त्यामुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

संजय यादवराव, बावा साळवी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईसह कोकणात 25 जागांवर विधानसभेला समृद्ध कोकण संघटना उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा संजय यादवराव यांनी यावेळी केली.

आमरण उपोषणामध्ये आंबा बागायदारांना कर्ज माफी मिळावी या मुख्य मागणीसह पर्यटन वाढण्यासाठी पायाभुत सुविधांचे मजबुतीकरण करावे, कृषी क्षेत्रालाही चांगले दिवस यावे यासाठी आंदोलन करण्यात आले. न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. 75 वर्षे कोकण दुर्लक्षित आहे. 38 टक्के उद्योग, प्रमुख बंदरे कोकणात आहेत. कोकण आर्थिक विकासाचा कणा आहे, तरी पायाभुत सुविधांची वानवा आहे. समृद्ध कोकण संघटनेने स्वायत्त कोकण हवे. शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होत नाही. म्हणून ठेकेदार बाजूला करून तज्ज्ञांचा यामध्ये समावेश करून निधीचा योग्य वापर करावा, अशी मागणी असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले.

कोकण विकास प्राधिकरण मंजूर आहे. परंतु त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद नाही. ही अनास्था संपावी यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु स्वायत्त कोकण ही आमची प्रमुख मागणी आहे ती शासनाने पूर्ण केली पाहिजे, अन्यथा आमचा लढा तीव्र करणार आहोत. विधानसभा निवडणुकीपूव शासन निर्णय बाहेर पडला आहे. सकारात्मक निर्णय घेतलात तर आम्ही सरकारला सहकार्य करू अन्यथा मुंबईसह कोकणात विधानसभेच्या 25 जागांवर कोकणभूमी उमेदवार उभे करेल. आमच्या उमेदवारांचा कोणाला फायदा होतो, कोणाला तोटा होतो याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमच्या आंदोलनाला कोकणी जनता किती पाठबळ देतेय हे निवडणुकीत स्पष्ट होईल यासाठीचा आमचा प्रयत्न आहे, असे श्री.यादवराव यांनी सांगितले.

स्वायत्त कोकण ही चळवळ दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. आमच्या चळवळीमध्ये विविध पक्षांचे लोक कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पक्षाचा राजिनामा दिला आहे. त्यामध्ये संजय यादवराव, बावा साळवी, सुरेंद्र आरेकर, अबीर काझी, विश्वनाथ पानगले, सचिन पाटोळे, रमेश पाटील यांचा समावेश आहे तर अजुनही काही कार्यकर्ते आपल्या पदांचे राजिनामे लवकरच त्यांच्या पक्षाकडे सुपूर्द करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 25-09-2024