बाबरी मशिदीच्या विनाशावर अश्रू आल्याचे सोनिया गांधींच्या पुस्तकात नमूद; बोफोर्स, आणीबाणी आणि भूतकाळातील घटनांवरून भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया
Sonia Gandhi Autobiography: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ‘Belonging: A Journey of Love’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतार, राजकारण आणि विविध महत्त्वाच्या घटनांवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. विशेषतः ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशिद पाडल्याची घटना टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात अश्रू आल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. सोनिया गांधींच्या या पुस्तकानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत असून, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, सोनिया गांधींचे हे आत्मचरित्र म्हणजे ‘मला पहा आणि फुले वाहा’ या मराठी म्हणीचा राजकीय आविष्कार आहे. हे आत्मपरीक्षण नसून स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा आणि गैरसोयीच्या प्रश्नांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. बाबरीबद्दल दुःख व्यक्त करून राजकीय सोय साधली जात आहे, परंतु बोफोर्स प्रकरणावर मौन का? बाटला हाऊस चकमकीनंतरच्या दाव्यांवर स्पष्ट भूमिका का नाही? आणीबाणी घटनाविघातक होती हे मान्य करतानाच मनमोहन सिंग यांच्या कालावधीत पडद्यामागून सत्तेचे नियंत्रण कोण करत होते? असे अनेक सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत. चुका इतरांच्या आणि नैतिकतेचा ठेका आपलाच, अशा भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
दुसऱ्या बाजूला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सोनिया गांधींच्या पुस्तकाचे आणि त्यांच्या जीवनप्रवासाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून रोहित पवार म्हणाले की, अत्यंत तरुण वयात भारत देशात आल्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या निधनासारख्या दोन मोठ्या वैयक्तिक आघातांना सामोरे जावे लागल्यानंतरही त्यांनी परत जाण्याचा मार्ग न निवडता देशाशी आपले नाते अधिक घट्ट केले. संकटांना न खचता सार्वजनिक जीवनात स्वतःला झोकून देण्याची त्यांची जिद्द प्रेरणादायी असल्याचे सांगत, त्यांनी सोनिया गांधींच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभवही यानिमित्ताने शेअर केला आहे.














