वारंवार घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार प्रकल्पाला अंतिम मंजुरी; व्यापारी, उद्योजक व नागरिकांकडून समाधान व्यक्त
Khedi Chiplun Fire Station: चिपळूण तालुक्यातील खेर्डी गाव तसेच खेर्डी एमआयडीसी परिसरात वारंवार घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांची शक्यता गांभीर्याने लक्षात घेऊन, येथे स्वतंत्र फायर स्टेशन उभारण्यात यावे, अशी अत्यंत महत्त्वाची मागणी युवासेना सरचिटणीस (रायगड-रत्नागिरी लोकसभा) उमेश खताते यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या अथक पाठपुराव्याला आता मोठे यश आले असून, प्रत्यक्षात फायर स्टेशनच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
यासाठी उमेश खताते यांनी संबंधित मंत्री महोदयांकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून जोरदार पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वी खेर्डी परिसरात घडलेल्या आगीच्या एका दुर्घटनेनंतर येथील फायर स्टेशनची तातडीची आवश्यकता पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली होती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात उमेश खताते यांनी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खेर्डीमध्ये लवकरात लवकर फायर स्टेशन उभारण्याची अत्यंत आग्रही मागणी केली होती.
या जनहिताच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला आदेश देत खेर्डीमध्ये फायर स्टेशन मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. अखेर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्षात फायर स्टेशनच्या उभारणीच्या कामास प्रारंभ झाला आहे.

उद्योजक, कामगार आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे खेर्डीतील व्यापारी वर्ग, एमआयडीसीमधील विविध उद्योजक, कामगार तसेच खेर्डी आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांतील नागरिकांमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. फायर स्टेशनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याबद्दल खेर्डीतील नागरिक व व्यवसायिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच, गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून खेर्डीच्या सुरक्षिततेचा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्री. उमेश खताते यांचेही सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
खेर्डीमध्ये नवीन फायर स्टेशन पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर केवळ खेर्डी गावालाच नव्हे, तर संपूर्ण खेर्डी एमआयडीसी, औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार, उद्योजक आणि लगतच्या गावांनाही आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत तातडीने अग्निशमन व सुरक्षा सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत मिळणार आहे. खेर्डीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक टप्पा ठरला असून, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे विकासाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडल्याची भावना नागरிகोंमधून व्यक्त होत आहे.













