Nitin Gadkari Test Tube Cow: टेस्ट ट्यूब बेबीनंतर आता ‘टेस्ट ट्यूब गाय’ विकसित केली जाणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात मांडला शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा ‘मास्टर प्लॅन’

Nitin Gadkari Test Tube Cow: टेस्ट ट्यूब बेबीनंतर आता ‘टेस्ट ट्यूब गाय’ विकसित केली जाणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात मांडला शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा ‘मास्टर प्लॅन’

देशी गायींचे दूध उत्पादन वाढवून विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार; लोकनेते दत्ताजी मेघे स्मारक व पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात गडकरींचे महत्त्वाचे प्रतिपादन

Nitin Gadkari Test Tube Cow: राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि अस्मानी संकटामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे त्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत. अशातच, केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अग्रीम मदत जाहीर केली असतानाच, आता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक मोठा दावा केला आहे. ‘ज्याप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान विकसित झाले, त्याचप्रमाणे आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘टेस्ट ट्यूब गाय’ विकसित केली जाणार आहे,’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा करत गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीचा नवा मास्टर प्लॅन सादर केला आहे.

नागपूर येथे लोकनेते दत्ताजी मेघे यांच्या स्मारकाचे लोकार्पण, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई मेघे पशु रुग्णालय लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कृषी आणि दुग्धव्यवसाय विकासावर सखोल भाष्य केले.

विदर्भातील दूध उत्पादन वाढविण्याचा निर्धार
आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी दत्ता मेघे यांच्या संघर्षाचा आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. रामटेक येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू व्हावे, हे दत्ता मेघे यांचे स्वप्न सागर मेघे यांनी पूर्ण केल्याचे सांगत गडकरी म्हणाले की, विदर्भात ‘मदर डेअरी’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. सध्या नागपुरातून दररोज दहा लाख लिटर दूध मदर डेअरी संकलित करत आहे. मात्र, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात जेवढे दूध उत्पादन होते, तेवढे उत्पादन संपूर्ण विदर्भातही होत नाही, याची खंत वाटते. या नव्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आणि मदर डेअरीच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठी चालना मिळणार आहे.

Horizon techno.

कृषी तंत्रज्ञान आणि पशुसंवर्धनातून शेतकरी समृद्ध होणार
पुढे बोलताना गडकरी यांनी ‘टेस्ट ट्यूब गाय’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. देशी गायींचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, येणाऱ्या काळात विदर्भात दूध उत्पादन सर्वाधिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भागातील शेतकऱ्यांनी यापूर्वी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत; परंतु शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, शेळीपालन प्रकल्प आणि डेअरी उद्योगाचा विकास झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होऊन ते निश्चितच समृद्ध होतील, असे ते म्हणाले. तसेच नागपूरच्या ऑरेंज बर्फीला दिल्लीतील नागरिकांकडूनही मोठी पसंती मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होत असल्याबद्दल गडकरी यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. भागवत हे स्वतः पशुवैद्यकीय डॉक्टर असल्याने त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ होणे ही सौभाग्याची गोष्ट असून, हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल, अशा शब्दांत गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या.