डेन्मार्कच्या ‘फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ संस्थेकडून मिळाली अंतिम मान्यता; महाराष्ट्रातील किनारपट्टी पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला मिळणार मोठी चालना
Konkan Blue Flag Beaches: महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी आणि विशेषतः कोकणच्या किनारपट्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद व ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) हा अंतिम पुरस्कार जाहीर झाला आहे. या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांना अंतिम मान्यता मिळाल्याची अधिकृत माहिती नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी दिली असून, डेन्मार्क येथील ‘फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत लवकरच या किनाऱ्यांना अधिकृत ‘ब्लू फ्लॅग’ प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन राज्यातील पर्यटनस्थळांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांची काटेकोर स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या बाबींना शासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे.
काय आहे ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्काराचे महत्त्व?
‘ब्लू फ्लॅग’ हा जगभरात मान्यताप्राप्त असलेला पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांसाठीचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जनजागृती आणि शाश्वत व्यवस्थापन अशा अत्यंत कठोर निकषांच्या आधारे हा पुरस्कार प्रदान केला जातो.

कोकणच्या पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना
महाराष्ट्राला सुमारे ८७८ किलोमीटर लांबीची विस्तीर्ण आणि निसर्गसमृद्ध किनारपट्टी लाभली आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, सागरी जैवविविधता, ऐतिहासिक वारसा आणि कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे कोकण पर्यटनाच्या दृष्टीने नेहमीच आकर्षण राहिले आहे. आता गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन किनाऱ्यांना मिळालेल्या अंतिम पुरस्कारामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय, होम-स्टे, हॉटेल उद्योग आणि पूरक रोजगार संधींना मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पर्यटन विभागाकडून आनंद आणि कटिबद्धता व्यक्त
या ऐतिहासिक यशाबद्दल प्रतिक्रिया देताना पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी सांगितले की, "गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा अंतिम पुरस्कार मिळणे ही महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. पर्यटन विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा योग्य समन्वय साधत शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर राहणार आहे."
तर पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले की, "या मानांकनामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक दृढ होईल. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याच्या आमच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे निश्चितच बळ मिळाले असून, भविष्यात राज्यातील अधिकाधिक पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे."













