Tukaram Mundhe FDA Advisory: दुकानातील सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका; अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नागरिकांना मोलाचा सल्ला

Tukaram Mundhe FDA Advisory: दुकानातील सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका; अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नागरिकांना मोलाचा सल्ला

केवळ सीलबंद पिशवीतील पाश्चराईज दूधच खरेदी करण्याचे आवाहन; खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांना तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा

Tukaram Mundhe FDA Advisory: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे. नागरिकांनी दुकानातून सुटे दूध, सुटे तूप आणि सुटे वनस्पती तेल खरेदी करणे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी भेसळमुक्त अन्न आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत सविस्तर भूमिका मांडली.

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी सुट्या दुधाच्या धोक्यांबाबत नागरिकांना सतर्क केले. ते म्हणाले की, "तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून कच्चे दूध विकत घेत असाल तर ते जरूर घ्या, परंतु दुकानातील सुटे दूध कदापि विकत घेऊ नका. शेतकऱ्याकडील कच्च्या दुधात आणि दुकानातील सुट्या दुधात खूप मोठा फरक असतो." पाश्चराईज दूध खरेदी करायचे असल्यास ते नेहमी सीलबंद पिशवीत किंवा पॅकेटमध्येच घ्यावे आणि खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची तारीख व एक्स्पायरी डेट (अंतिम मुदत) नीट तपासून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

भेसळखोर विक्रेत्यांना कठोर कारवाईचा इशारा
यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांना कडक शब्दांत ताकीद दिली. तूप, लोणी आणि वनस्पती तेलामध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. कोणताही शास्त्रीय आधार नसताना ‘शुद्ध देसी तूप’ किंवा ‘१०० टक्के प्युअर’ असे दिशाभूल करणारे दावे खपवून घेतले जाणार नाहीत. ग्राहकांनी हे लक्षात ठेवावे की ‘१०० टक्के प्युअर’ असा कोणताही अधिकृत प्रकार नसतो; जर कोणी असा दावा करून तूप किंवा दुधाची विक्री करत असेल, तर नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ कळवावे, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Shanti 3

दुधाची साठवणूक आणि तापमानाचे महत्त्व
सुटे दूध आरोग्यासाठी का धोकादायक ठरू शकते, यामागील शास्त्रीय कारणही मुंढे यांनी समजावून सांगितले. ते म्हणाले की, रोज सकाळी घरी येणारे दूध त्याआधी दुकानातील फ्रिजरमध्ये ठेवलेले असते; मात्र त्या फ्रिजमध्ये आवश्यक असलेले ४ अंश सेल्सिअस तापमान राखले जाते का, याची खात्री नसते. तसेच, सुटे दूध ज्या टँकरमधून आणले जाते, तो टँकर पूर्णपणे स्वच्छ आहे का याची १०० टक्के शाश्वती देता येत नाही. गाई किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर ते दोन तासांपेक्षा जास्त वेळ उघड्यावर सामान्य तापमानात राहिल्यास त्यामध्ये आम्लता (अ‍ॅसिडिटी) निर्माण करणारे घटक तयार होतात, त्यामुळे नागरिकांनी दूध खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.