Anil Patil on NCP Merger: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा; राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची मागणी

Anil Patil on NCP Merger: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा; राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची मागणी

अजित पवारांच्या घातपाताचे पुरावे रामदास कदम यांच्याकडे असतील, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा अनिल पाटील यांचा आरोप

Anil Patil on NCP Merger: अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय किंवा पुरावा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्याकडे होता, तर सर्वप्रथम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चा केवळ माध्यमांमध्येच असून, आमचे आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरणही अनिल पाटील यांनी दिले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना आमदार अनिल पाटील यांनी रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. अनिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार, रामदास कदम यांच्याकडे जर अजित पवारांच्या घातपाताची इतकी माहिती किंवा संशय होता, अथवा सुनील तटकरे यांचा यामध्ये हात असल्याचा काही पुरावा त्यांच्याकडे असेल, तर त्यांच्याच घरामध्ये योगेश कदम हे गृहराज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. जर गृहराज्यमंत्र्यांच्याच घरात असे पुरावे असतील आणि ते आतापर्यंत सीबीआय किंवा कोणत्याही तपास यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केली नसेल, तर सर्वात आधी योगेश कदम यांचाच राजीनामा घेतला पाहिजे, असे मत अनिल पाटील यांनी मांडले.

पुढे बोलताना अनिल पाटील यांनी असेही नमूद केले की, या प्रकरणाचे पुरावे रामदास कदम यांच्याकडे असूनही ते तपास यंत्रणांपर्यंत पोहोचू दिले नसतील, तर रामदास कदम यांनी आधी आपल्या मुलाचा राजीनामा द्यायला हवा. योगेश कदम यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केला असल्याचा आरोप करत, त्यांनी राजीनामा देण्यास हरकत नाही आणि त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते त्यांनी यंत्रणांकडे सादर करावेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Shanti 3

विलीनीकरणाची चर्चा केवळ माध्यमांमध्येच: अनिल पाटील
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत खासदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या बातम्यांचे अनिल पाटील यांनी खंडन केले आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ही केवळ माध्यमांमध्येच सुरू असून, विलीनीकरणासाठी पक्षाचे आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटींबाबत अधिक स्पष्टीकरण देताना माजी मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आमदार त्यांची भेट घेऊ शकतात; मात्र ही भेट विलीनीकरणाच्या संदर्भात नाही. शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात पक्षातील कोणत्याही आमदाराला कोणताही निरोप देण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.