१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार भूमिपूजन सोहळा; येत्या दोन ते अडीच वर्षांत सुसज्ज इमारत उभी राहण्याचा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा विश्वास
Chiplun Municipality New Building: चिपळूण नगरपालिकेची तब्बल १५० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक इमारत आता पाडली जाणार असून, त्या जागी सर्व सुविधांनी युक्त अशी नवीन अद्ययावत इमारत बांधण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभहस्ते शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
सध्या चिपळूण नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी विभागला गेला आहे. यामुळे नागरिकांना आणि प्रशासकीय कामकाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या नव्या इमारतीचे भूमिपूजन झाल्यानंतर येत्या दोन ते अडीच वर्षांत ही सुसज्ज इमारत पूर्णपणे उभी राहील, असा ठाम विश्वास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला आहे.
दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आणि जय्यत तयारी
चिपळूण नगरपालिका प्रशासनातर्फे या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. चिपळूणच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या या सोहळ्यासाठी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, माजी नगराध्यक्ष आणि नागरिकांना नगरपालिका प्रशासनातर्फे आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे.














