समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी नवीन यंत्रणा सज्ज; पोलिस आणि होमगार्ड जवानांना देण्यात आले विशेष प्रशिक्षण
Guhagar Police Robotic Watercraft: रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या अभिनव संकल्पनेतून, तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गुहागर पोलिस ठाण्याला एक अत्यंत आधुनिक असे ‘रोबोटीक वॉटर क्राफ्ट’ (Robotic Watercraft) प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण यंत्रणेमुळे गुहागर समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा आता अधिक मजबूत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन गणपतीपुळे येथे दोन, तर गुहागर, दापोली आणि आरे-वारे या प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर प्रत्येकी एक अशा एकूण पाच रोबोटीक वॉटर क्राफ्टचे वाटप करण्यात आले आहे. पुणे, मुंबई व घाट माथ्यावरून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना येथील समुद्रकिनाऱ्यांचे नेहमीच विशेष आकर्षण असते. सुमारे सात किलोमीटर लांबीचा स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभलेले गुहागर हे ठिकाण श्री देव व्याडेश्वर आणि दुर्गादेवी या कुलदैवतांमुळे प्रसिद्ध आहे. यामुळे येथे वर्षातील बाराही महिने पर्यटकांची मोठी गर्दी असते.
अशी काम करणार रोबोटीक वॉटर क्राफ्ट यंत्रणा:
गुहागर किनाऱ्यावर समुद्रस्नानासाठी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी उसळत असते; परंतु अनेकदा उत्साहाच्या भरात पर्यटक खोल समुद्रात जातात आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडण्याची दुर्घटना घडते. अशा आपत्कालीन प्रसंगी पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढणे कठीण होते. यासाठी गुहागर नगरपंचायतीकडून आधीच किनारपट्टीवर जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. आता त्यांच्या सोबतीला या आधुनिक ‘रोबोटीक वॉटर क्राफ्ट’ची मोठी मदत होणार आहे.

समुद्रकिनाऱ्यावर एखादी दुर्घटना घडल्यास यंत्रणा तातडीने कामाला लागावी, या उद्देशाने गुहागर पोलिस ठाण्याकडून पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड जवानांना विशेष प्रशिक्षित करण्यात आले आहे. संबंधित प्राधिकृत यंत्रणेमार्फत या कर्मचाऱ्यांना रोबोटीक वॉटर क्राफ्ट चालवण्याचे आणि हाताळण्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या प्रात्यक्षिकांच्या वेळी पोलिस निरीक्षक प्रवीण रणदिवे, पोलिस कर्मचारी प्रशांत पाटील, उदय मोनये, भावेश रोहिलकर, किशोर साळवी, अनिकेत चव्हाण, कुमार घोसाळकर यांच्यासह अनेक होमगार्ड जवान उपस्थित होते. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे गुहागर किनारपट्टीवरील पर्यटनाची सुरक्षा यंत्रणा अधिक वेगवान आणि सक्षम झाली आहे.













