महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरीतील लाडघर व गुहागरसह राज्यातील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर!

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरीतील लाडघर व गुहागरसह राज्यातील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर!

रायगडमधील श्रीवर्धन किनाऱ्याचाही समावेश; २०२६-२७ च्या पर्यटन हंगामासाठी निवड, जागतिक नकाशावर महाराष्ट्राच्या सागरी पर्यटनाची मोठी झेप

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या आणि विशेषतः कोकणच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राज्यातील तीन समुद्रकिनाऱ्यांना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ब्ल्यू फ्लॅग’ (Blue Flag) पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर (ता. दापोली) आणि गुहागर या दोन निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचा, तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा समावेश आहे. २०२६-२७ या पर्यटन हंगामासाठी आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने या तिन्ही किनाऱ्यांची अधिकृत निवड केली आहे.

जागतिक दर्जाच्या यादीत महाराष्ट्राचे नाव पहिल्यांदाच झळकणार :

पर्यावरणपूरकता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यटकांसाठी असलेल्या जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांच्या निकषांवर ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन दिले जाते. आंतरराष्ट्रीय ज्युरीने राज्यातील या तीन किनाऱ्यांवर शिक्कामोर्तब केल्यामुळे जगातील सर्वात स्वच्छ आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव पहिल्यांदाच झळकणार आहे.

Radhakrushna patapedhi

कोकणच्या सागरी पर्यटनाला मिळणार नवी चालना :

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर (ताम्रतीर्थ) आणि गुहागर हे दोन्ही किनारे पर्यटकांचे अत्यंत आवडते पर्यटनस्थळ आहेत. आता या किनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग’ दर्जा मिळाल्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ कोकणाकडे मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या जागतिक मानांकनामुळे स्थानिक रोजगार निर्मिती, पर्यटन व्यवसाय आणि पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून कोकणच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.