Bird in Ratnagiri: हिवाळ्याच्या आगमनाने रत्नागिरीच्या किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन, काळबादेवी किनाऱ्यावर पक्षीप्रेमींची गर्दी

Bird in Ratnagiri: हिवाळ्याच्या आगमनाने रत्नागिरीच्या किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन, काळबादेवी किनाऱ्यावर पक्षीप्रेमींची गर्दी

रत्नागिरीतील काळबादेवी किनाऱ्यावर विविध स्थलांतरित पक्ष्यांची नोंद; निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी पर्वणी

रत्नागिरी: हिवाळ्याची चाहूल लागताच उत्तर गोलार्धातील थंड प्रदेशांमधून परदेशी स्थलांतरित पक्ष्यांनी भारतीय किनारपट्टीकडे प्रवास सुरू केला असून, रत्नागिरीच्या (Ratnagiri) काळबादेवी किनाऱ्यावर (Kalbadevi Beach) या पाहुण्या पक्ष्यांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. स्थानिक पक्षीनिरीक्षकांनी या किनाऱ्यावर विविध दुर्मिळ प्रजातींची नोंद केली असून, यामुळे रत्नागिरीतील पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांची पावले या किनाऱ्याकडे वळू लागली आहेत.

स्थानिक पक्षीनिरीक्षक विराज आठले, निकीता शिंदे आणि अक्षय तोंडवळकर यांनी रत्नागिरीच्या या किनारपट्टीवरून या स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. या पक्ष्यांच्या आगमनामुळे कोकणातील किनारपट्टीवरील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

काळबादेवी किनाऱ्यावर कोणत्या प्रजातींचे आगमन?
रत्नागिरीतील काळबादेवी किनाऱ्यावर नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यावर खाद्य शोधणारे टर्न, तसेच चिखलमय किनारपट्टी आणि उथळ पाणथळ जागांमध्ये वावरणारे विविध किनारपक्षी आढळले आहेत. यात छोटा तुरेवाला सुरय (Lesser Crested Tern), मोठा तुरेवाला सुरय (Greater Crested Tern), सामान्य सुरय (Common Tern) आणि कुरव चोचीचा सुरय (Gull-billed Tern) या टर्न प्रजातींचा समावेश आहे. याशिवाय युरेशियन कोरल (Eurasian Curlew), मोठा जलरंक (Great Knot), केंटिश चिखल्या (Kentish Plover), बाकचोच तुतारी (Curlew Sandpiper) आणि उलटचोच तुतारी (Terek Sandpiper) यांसारखे पक्षीही किनाऱ्यावर दाखल झाले आहेत.

Nadi pariksha

हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोकणात मुक्काम
भारतीय किनारपट्टीवर येणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांचा प्रवास प्रामुख्याने उत्तर गोलार्धातील थंड प्रदेशांपासून सुरू होतो. सायबेरिया, रशिया, मंगोलिया, मध्य आशिया आणि युरोपमधील काही भाग हे या पक्ष्यांचे मुख्य प्रजनन अधिवास आहेत. थंडीची चाहूल लागताच हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून अन्न आणि सुरक्षित आधाराच्या शोधात दक्षिण आशियातील किनारपट्टीवर दाखल होतात.

यामध्ये उलटचोच तुतारी हा पक्षी फिनलंडपासून बैकल सरोवरापर्यंतच्या प्रदेशात प्रजनन करतो, तर बाकचोच तुतारी हा आर्क्टिक सायबेरियातील प्रजनन अधिवासातून आफ्रिका, भारत आणि ऑस्ट्रेलियाकडे स्थलांतर करतो. तसेच मोठा जलरंक हा उत्तर-पूर्व आशिया आणि सायबेरियातील प्रजनन क्षेत्रांशी संबंधित असून, हिवाळ्यात तो दक्षिण-पूर्व आशिया आणि भारतीय किनारपट्टीवर आश्रय घेतो. युरोप आणि उत्तर आशियातून येणारा युरेशियन कोरल आणि सामान्य सुरय हे पक्षी देखील मध्यपूर्व आणि अरबी समुद्रमार्गे रत्नागिरीच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचतात.