गुरुत्व पद्धतीने खेड शहराला पाणीपुरवठा; आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईपासून नागरिकांना मोठा दिलासा
खेड: खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन बोरज धरणात (boraj dam water level khed) यंदा समाधानकारक आणि मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शहरवासीयांची आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता तूर्स मिटली आहे. सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता पुढील २०० ते २२० दिवस शहराला सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे, तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खेड धरणाची पाणीसाठवण क्षमता ३.३९६ दलघमी असून, पावसानंतरच्या नियोजित पाण्याचा वापर आणि साठ्यातील घट विचारात घेता सध्या ८० ते ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मान्सूनच्या काळात धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आगामी हिवाळा आणि उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी हा साठा उपयुक्त ठरणार आहे.
गुरुत्व पद्धतीमुळे नगरपालिकेच्या वीजबिलाची बचत

शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरज धरणाचे खेड शहराच्या पाणीपुरवठ्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. विशेष म्हणजे, या धरणातून गुरुत्व बलाच्या साहाय्याने कोणत्याही अतिरिक्त पंपिंगशिवाय नळादवारे थेट शहरात पाणी पोहोचते. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी लागणारी विजेवरील अवलंबीकता कमी होऊन नगरपालिकेच्या वीजबिलापोटी होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. या दृष्टीने बोरज धरण शहरासाठी वरदान ठरत आहे.
दरम्यान, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा पाटबंधारे विभाग आणि नगर परिषद प्रशासनाकडून पाण्याचा अपव्यय रोखणे, वितरण व्यवस्थेतील गळती कमी करणे तसेच उपलब्ध साठ्याच्या योग्य नियोजनावर भर दिला जात आहे. धरणात पुरेशा पाणीसाठा उपलब्ध असला तरी उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून बोरज धरणातील समाधानकारक जलसाठ्यामुळे खेड शहराला यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे.













