Lanja Dialysis Center Reopens: लांजा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर पूर्ववत सुरू; आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश

Lanja Dialysis Center Reopens: लांजा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर पूर्ववत सुरू; आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश

कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावरून ठप्प झालेली सेवा बुधवारपासून पुन्हा कार्यान्वित; गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा

लांजा: Lanja Dialysis Center Reopens लांजा ग्रामीण रुग्णालयातील बंदावस्थेत असलेली डायलिसिस सेंटर सेवा आमदार किरण सामंत यांच्या ठोस भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बुधवारपासून पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आली आहे. शासकीय दवाखान्यांमध्ये तांत्रिक आणि वेतनाच्या समस्यांमुळे कोलमडलेली ही अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू झाल्याने लांजा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी हे एकप्रकारे जीवनदान ठरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयांमधील विविध अडचणींमुळे डायलिसिस सेवेवर मोठा परिणाम झाला होता. डायलिसिस सेंटरमधील टेक्निशियन तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याने संबंधित एजन्सीने बुधवारपासून लांजा-राजापूर तसेच रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील डायलिसिस सेंटर बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करणे अत्यावश्यक असते; अशा परिस्थितीत सेंटर बंद झाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊन ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना उपचारांसाठी दूरवर जाण्याची वेळ येणार होती.

आमदार किरण सामंत यांची ठाम भूमिका आणि स्वखर्चातून वेतनाची तयारी

Lok. Tilak hospi.

रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार किरण सामंत यांनी संबंधित एजन्सीला दिला होता. लांजा-राजापूर आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील डायलिसिस रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. डायलिसिस सेंटर बंद करण्यामागे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न असेल तर त्यावरही मार्ग काढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. कोणत्याही परिस्थितीत डायलिसिस सेवा बंद पडू देणार नाही, प्रशासनाने किंवा संबंधित यंत्रणेने जबरदस्तीने सेंटर बंद करण्याचा प्रयत्न करू नये आणि आवश्यकता भासल्यास डायलिसिस टेक्निशियनना सोबत घेऊन त्यांच्या पगाराची जबाबदारी स्वतःच्या खर्चातून उचलण्यासही आपण तयार आहोत, अशी ठाम भूमिका आमदार सामंत यांनी मांडली. या दबावानंतर बुधवारी सकाळी लांजा ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले.

कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

डायलिसिस सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर रुग्णालय परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, उद्योजक बाबा भिंगार्डे, सचिन भिंगार्डे आणि माजी नगरसेवक नंदराज कुरूप उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच डायलिसिस सेंटरचे टेक्निशियन मनोज कांबळे, हृतिक शिवगण, मानसी गुरव आणि नीलेश सुवारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.