१० ते १६ नोव्हेंबर दरम्यान कुरक्षेत्र विद्यापीठात आयोजन; रत्नागिरीतील ६ विद्यार्थी आणि १ कार्यक्रम अधिकाऱ्याचा सहभाग
राजापूर: National Integration Camp या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने हरियाणा येथील कुुरुक्षेत्र विद्यापीठात १० ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांमधील सांस्कृतिक कलागुणांची जाण ओळखत या शिबिरात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी रत्नागिरी जिल्ह्याच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला प्राप्त झाली आहे.
या शिबिरात संपूर्ण देशातील सुमारे २०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक वैविध्यांचे संमेलन, विविध कलागुणांचे प्रदर्शन, युवा संवाद, तसेच नेतृत्व गुण विकास इत्यादी विषयांवर या शिबिरामध्ये विशेष भर दिला जात आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या या टीममध्ये डीबीजे कॉलेज चिपळूणचे विद्यार्थी वाकाटे वेदांत व शिंदे ऋतिका, ज्ञानदीप कॉलेज खेडचा ओम बेलोसे, गुरुकुल कॉलेज चिपळूणचा कदम संकुल व होलकर साक्षी, गोगटे जोगळेकर कॉलेजची किर हिंदवी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यांच्याबरोबर गुरुकुल कॉलेजचे कार्यक्रमधिकारी प्रा. आशिष चव्हाण असे तीन मुले, तीन मुली आणि एक कार्यक्रमधिकारी अशा सात जणांची टीम महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी रत्नागिरी जिल्ह्याला प्रथमच लाभली असून येथील विद्यार्थी अत्यंत उत्तम परफॉर्मन्स करत आहेत. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समन्वयक डॉ. युवराज पाटील, डॉ. विकास पाटील तसेच महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व विद्यार्थी आणि टीमने यशस्वी व्हावे, अशा शब्दांत मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील शिंदे आणि रत्नागिरी जिल्हा एनएसएस समन्वयक डॉ. राहुल मराठे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.














